उदयनराजेंच्या पराभवातही तीन सत्ते I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

उदयनराजेंच्या पक्ष बदलाच्या कृतीमुळे जिल्ह्यात त्यांच्याबद्दल नाराजीची भावना होतीच; परंतु शरद पवारांच्या सभेने ती पराकोटीला नेली.

सातारा : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील सुमारे 87717 हजार मतांनी विजयी झाले. रात्री दहा वाजता शेवटची माहिती हाती आली तेव्हा उदयनराजेंना पाच लाख 48 हजार 9043 मते मिळाली होती, तर श्रीनिवास पाटील यांना सहा लाख 36 हजार 620 मते पडली होती. 

दरम्यान उदयनराजेे सात हा अंक लकी असल्याचे जाहीरपणे सांगतात परंतु त्यांच्या पराभवाच्या मताधिक्यातही तीन वेळा सात आकडा आल्याचा तसेच शरद पवार यांनीही सात तारखेपासून संपुर्ण राज्यात प्रचाराचा धडाका लावला हाेता हा एक याेगायाेगच घडून आला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाल्यानंतरही अवघ्या काही महिन्यांतच उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्‍वभूमीवर ही लढत शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. साताऱ्यात भरपावसात झालेल्या सभेत त्यांनी "आधी उदयनराजेंना तिकीट देऊन मी केलेली चूक तुम्ही दुरुस्त करा,' असे भावनिक आवाहन सातारकरांना केले होते. 
या विजयामुळे सातारकरांनी चूक दुरुस्त केली, अशीच चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात सुरू झाली आहे. पहिल्या फेरीपासूनच श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनिहाय ही आघाडी वाढतच गेली. उदयनराजे व श्रीनिवास पाटील यांची लढत अत्यंत अटीतटीची होईल, असा सर्वांचा अंदाज होता. परंतु, तो अंदाज फोल ठरवला. 

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील लोकसभेची जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी मैदानात उतरले. त्यांची सातारा तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कऱ्हाडमध्ये प्रचार सभा झाली. त्यातून वातावरण बदलण्याचा प्रयत्न भाजपने केला; परंतु मोदी यांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांची साताऱ्यात सभा झाली. बालेकिल्ला राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या या नेत्याला धो-धो कोसळत्या पावसालाही रोखता आले नाही. तुफान पावसात त्यांनी उदयनराजेंना उमेदवारी दिली ही माझी चूक झाली, अशी जाहीर कबुली दिली. त्याचबरोबर मी केलेली चूक तुम्ही सुधारा, असे भावनिक आवाहनही जिल्ह्यातील जनतेला केले. उदयनराजेंच्या पक्ष बदलाच्या कृतीमुळे जिल्ह्यात त्यांच्याबद्दल नाराजीची भावना होतीच; परंतु शरद पवारांच्या सभेने ती पराकोटीला नेली.

अशी आहेत मते 
एकूण माेजलेली मते - 1247187 
श्रीनिवास पाटील - 636620 मते 
उदयनराजे - 548903
चंद्रकांत खंडाईत - 17203 
व्यंकटेशजी स्वामी - 1577
शिवाजीराव जाधव - 26407
अलंकृता बिचुकले - 1645
शिवाजी भाेसले 4673 
नाेटा - 10159
(संदर्भ - निवडणूक आयाेग संकेतस्थळ रात्री साडे दहा पर्यंत)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Lok Sabha 2019 election Satara final result NCP Won