चंदगड : चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांची मुसंडी | Election Results 2019

सुनील कोंडुसकर
Thursday, 24 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतल्यानंतर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अंतिम टप्यात राजेश पाटील यांची उमेदवारी जाहिर केली.

चंदगड - चंदगड विधानसभा मतदारसंघातून अतिशय चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश पाटील यांनी मुसंडी मारली. पहिल्या बारा फेरीत वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पाटील यांच्यावर सातत्याने आघाडी घेतली. नवव्या फेरीत ते 12 हजार मतांनी आघाडीवर होते. परंतु 13 व्या फेरीपासून मागे पडत गेले.

पंधराव्या फेरीत राजेश यांनी अप्पी पाटील यांच्यावर आघाडी घेतली. त्याचवेळी भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांची मतांची आकडेवारी वाढत गेली. त्यांना 19 व्या फेरीत 50 हजार 920 मते पडली तर राजेश पाटील यांना 54 हजार 851 मते पडली. 3 हजार 931 मते अधिक टपाली मतांतून राजेश यांना विजयी घोषित करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतल्यानंतर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अंतिम टप्यात राजेश पाटील यांची उमेदवारी जाहिर केली. शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, वंचितचे अप्पी पाटील, जनसुराज्य शक्तीचे अशोक चराटी, रमेश रेडेकर अशा दिग्गजांसह चौदा उमेदवार रिंगणात होते. पडलेली मते पाहता त्यांचाच प्रभाव दिसून आला.

आजरा विभागात राजेश पाटील यांनी तर गडहिंग्लज विभागात वंचितचे अप्पी पाटील यांनी मतांची आघाडी घेतली. चंदगड विभागात राजेश यांना शिवाजी पाटील यांनी झुंजवले. परंतु गडहिंग्लज तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मदतीमुळे राजेश यांचा विजय सोपा झाला.टपाली मतदान वगळता 19 व्या फेरीत त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी शिवाजी पाटील यांच्यावर 3 हजार 931 मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. 

प्रमुख उमेदवार आणि त्यांना पडलेली मते अशी -

राजेश पाटील (राष्ट्रवादी) - 54 हजार 851

शिवाजी पाटील (भाजप बंडखोर) - 50 हजार 920

अप्पी पाटील (वंचित बहुजन आघाडी)- 43 हजार 839,

संग्रामसिंह कुपेकर (शिवसेना)- 32 हजार 782.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Kolhapur Chandgad final result ncp Rajesh Patil won