जयकुमार गोरेंनी ठाेकला विजयी शड्डू I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अतिशय चुरस होणार, याची सर्वांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात मतदानात बरंच घडलं- बिघडलं. याची प्रचिती आज बाहेर पडलेल्या निकालातून दिसून आली. 

सातारा - माण विधानसभा मतदारसंघात भाजपचे जयकुमार गाेरे हे 2955 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 91 हजार 230 मते मिळाली आहेत. आमचे ठरलंय आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना 88 हजार 275 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे शेखर गाेरेंना 37 हजार 518 मते मिळाली आहेत.
 

शेवटपर्यंत उत्सुकता शिगेला पोचलेल्या माण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या जयकुमार गोरे यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली. सर्वपक्षीय आघाडीला धोबीपछाड देत त्यांनी मिळवलेला विजय लक्षणीय आहे. माण विधानसभा मतदारसंघाबद्दल सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात चर्चा होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदाराकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केलेल्या आमदार जयकुमार गोरे यांना "आमचं ठरलंय' या सर्वपक्षीय विकास आघाडीचे प्रभाकर देशमुख व शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलेल्या शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते. 

जयकुमार यांनी मुख्यमंत्र्यांची, तर शेखर गोरे यांनी उद्धव ठाकरेंची सभा घेऊन चांगलीच हवा निर्माण केली होती, तर प्रभाकर देशमुख यांनी स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांच्या सोबतीने वातावरण तापवले होते. त्यामुळे अतिशय जबरदस्त चुरस होणार, याची सर्वांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात मतदानात बरंच घडलं- बिघडलं. याची प्रचिती आज बाहेर पडलेल्या निकालातून दिसून आली. 

मतमोजणीच्या सुरवातीपासूनच जयकुमार गोरे यांनी घेतलेली आघाडी पहिल्या 15 फेरीअखेर कायम ठेवली. यात माणमधील सर्वच गट, दहिवडी नगरपंचायत व म्हसवड नगरपालिकेमध्ये जयकुमार गोरे आघाडीवर राहिले. त्यामुळे माणमधील प्रभाकर देशमुख यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांचे दावे फोल ठरले. आंधळी गटाने अनपेक्षितपणे जयकुमार गोरे यांना म्हणावी अशी आघाडी दिली नाही. मात्र, त्याची भरपाई त्यांनी इतर गटांत काढली. या निवडणुकीत माणमधील आघाडी दहा हजारांच्या आत मर्यादित ठेवण्याचे देशमुख यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत, तर खटावमधून मोठे मताधिक्‍य मिळेल ही अपेक्षाही फोल ठरली. त्यातच शेखर गोरे यांना माण तालुक्‍याने साथ दिली नाही. मात्र, खटावमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात मते घेतली. त्याचा मोठा फटका देशमुखांना बसला.
 
जयकुमार गोरे विरोधी असलेल्या वातावरणाचा लाभ घेण्यात प्रभाकर देशमुख अपयशी ठरले. नेत्यांचा भरणा अपवाद वगळता कुचकामी ठरला. तळागाळात जाऊन काम करण्यात नवख्या यंत्रणेला जमले नाही. यंत्रणेतील समन्वयाचा अभाव हे पराभवाचे एक कारण आहे. संपूर्ण मतदारसंघात विरोधी वातावरण असूनही आपल्या जीवभावाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर, सक्षम यंत्रणा राबवून विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवले. शेखर गोरेंच माणमधील अपयश जयकुमार गोरेंच्या पथ्यावर पडले, तर खटावमध्ये शेखर गोरे यांनी घेतलेली मते देशमुख यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.
 
शेखर गोरे पहिल्यापासूनच कुठेही स्पर्धेत दिसले नाहीत. खरी लढत झाली, ती जयकुमार गोरे व प्रभाकर देशमुख यांच्यात. मात्र, माणमध्ये ज्या ठिकाणी शेखर गोरे यांनी मते घेणार अशी हवा होती. तिथे त्यांना काहीच मते मिळाली नाहीत व ती मते जयकुमार गोरे यांच्याकडे वळल्याची चर्चा आहे, तर खटावमध्ये प्रभाकर देशमुख यांच्याकडे जाणारी मते रोखून धरण्यात शेखर गोरे यांनी यश मिळवले, तर अमृत सूर्यवंशी यांनी खाट या चिन्हावर तब्बल तीन हजारपेक्षा जास्त मिळवली. त्यामुळे भावानेच भावाला तारले, तर चिन्ह साधर्म्यामुळे खाटेने टेबलाला मारले अशी चर्चा रंगली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Mann final result BJP Won