esakal | मिरज : सुरेश खाडेंंच्या हॅटट्रिकला घटत्या मताधिक्याची किनार | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

मिरज : सुरेश खाडेंंच्या हॅटट्रिकला घटत्या मताधिक्याची किनार  | Election Results 2019

सुरेश खाडे यांंचा 'अबकी बार एक लाख पार' हा नारा मतदारांनी फोल ठरवला असला तरी सलग तिसऱ्या वेळी मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी मिळवलेले यश हे मात्र ऐतिहासिक आहे.

मिरज : सुरेश खाडेंंच्या हॅटट्रिकला घटत्या मताधिक्याची किनार | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज - विधानसभा संघात सलग तिसरा विजय मिळवीत सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी अचूक हॅट्रिक साधली खरी पण त्यांच्या या हॅट्रिकला घटलेल्या मताधिक्याची लागलेली काळी किनार मात्र भाजपच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

सुरेश खाडे यांंचा 'अबकी बार एक लाख पार' हा नारा मतदारांनी फोल ठरवला असला तरी सलग तिसऱ्या वेळी मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी मिळवलेले यश हे मात्र ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी 65 हजार 971 पेक्षा अधिक मते मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटनेस नवसंजीवनी दिली पण त्याचे श्रेय कोणाला द्यायचे हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे. याच निवडणूकीत अन्य उमेदवार आणि नोटाला मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. 

2009, 2014 आणि आता 2019 अशा सलग तीन निवडणुकांमध्ये सुरेश खाडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय मिळवून भारतीय जनता पक्षाची मिरज मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातील पाळेमुळे घट्ट केल्याचे यावेळी या निवडणुकीत सिद्ध केले. तरीही या निवडणुकीत विरोधी पक्षांची वाढलेली ताकद तितकीच लक्षवेधी आहे.

केवळ हजारो कोटी रूपयांच्या खर्चाचे दावे आणि रेडिमेड नेत्यांची भरती करुन लाखाच्या मताधिक्याची स्वप्ने पाहणे किती चुकीचे असते हेही या निवडणूक निकालाने स्पष्ट केले. बाळासाहेब होनमोरे यांंना मिळालेल्या मतांमुळे मिरज विधान सभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी नेमक्या कोणत्या पक्षाची ताकदत वाढली याचाही विचार होणे आवश्यक आहे.

यावेळी निवडणूक रिंगणात गंगाराम सातपुते (ब स पा) सुरेश खाडे (भाजपा) नानासाहेब वाघमारे (वंचित आघाडी) बाळासाहेब रास्ते (बळीराजा पार्टी) बाळासाहेब होनमोरे (स्वाभिमानी पक्ष ) सदाशिव खाडे (जनता दल सेक्युलर) प्रा.डॉ. प्रशांत गंगावणे (अपक्ष) हे सात उमेदवार होते. यापैकी सर्वाधिक 96 हजार 369 मते एवढी मते खाडे यांना मिळाली आणि ते त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी पक्षाचे बाळासाहेब होनमोरे यांचा 30 हजार 398 मतांनी पराभव करून विजयी झाले. 

निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साठी सोडल्याने या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का होता यापूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकीत होनमोरे हे खाडे यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या वतीने तर यावेळी शेतकरी संघटनेच्यावतीने निवडणूक मैदानात उतरले.

तत्पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी बेळंकीच्या शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या उमेदवारीसाठी केलेल्या खटाटोपामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये वेगळा संदेश गेला. भाजपाचे श्री खाडे आणि स्वाभिमानी पक्षाचे श्री होनमोरे या दोघांनीही शिवाचार्य महाराजांच्या मठात प्रचाराचा शुभारंभ केल्याने याची एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

खाडे यांच्या 'अबकी बार एक लाख बार' या घोषणेचा उलटा परिणाम त्यांच्या प्रचार यंत्रणेवर झाला. साहजिकच त्यांच्या प्रचारासाठी राज्यातील कोणीही प्रभावी नेता मिरजेकडे फिरकला नाही. हेच स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांच्या बाबत घडले. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अथवा काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी मिरजेच्या नावासमोर जणूकाही फुली मारली होती. मात्र राजू शेट्टी, मनोज शिंदे, विशाल पाटील यांनी बरीच मेहनत घेऊन या नेत्यांची उणीव भरून काढली.

एकूणच मिरज विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक प्रस्थापित भारतीय जनता पक्षास आत्मपरीक्षण करायला लावणारी तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटनेस चांगला संकेत देणारी ठरली.

loading image