शिवेंद्रसिंहराजेंनी गड राखला ; मताधिक्य घटले I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकलेंना केवळ 759 मते.

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे हे चाैथ्यांदा आमदार झाले आहेत. यंदा भाजपमधून निवडणूक लढविणारे राजेंचे मताधिक्य मात्र सुमारे 4389 मतांनी घटले आहे. सन 2014 मध्ये ते 47 हजार 813 मतांच्या फरकाने विजयी झाले हाेते. 

विकासपर्व उभे करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमधून सातारा- जावळी विधानसभेचा गड लढला खरा; पण राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवून दीपक पवार यांनी पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजे यांना विजयासाठी झुंजविले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवेंद्रसिंहराजेंच्या मताधिक्‍यात घटच झाली.
 
सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी लढली जाईल, अशी स्थिती प्रारंभीपासूनच होती. अभयसिंहराजे भोसले यांनी सहा वेळा, तर शिवेंद्रसिंहराजेंनी तीन वेळा या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले होते. चौथ्यांदा त्यांनी या निवडणुकीसाठी ताकदीने रिंगणात उतरले होते. शिवेंद्रसिंहराजेंच्या गोटातून दीपक पवारांवर निवडणुकीपुरते उगविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे सांगितले जात होते, तर पवारांच्या गटातून त्यावर प्रतिहल्ला चढविला जात होता. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा, जावळीमध्ये स्वत:च्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून घट्ट मोट बांधली आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादीला उमेदवार मिळणेही अडचणीचे झाले होते. अशावेळी शिवेंद्रसिंहराजेंची उमेदवार पचनी न पडल्याने दीपक पवार यांनी भाजपला बाय- बाय करून राष्ट्रवादीतून उमेदवारी पत्करली. सातारा शहर व उपनगरातील शिवेंद्रसिंहराजेंवरील नाराज गटातील मते कॅच करण्यात पवारांना यश आले. मात्र, जावळीतील स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना जावळीमधून प्रभाव पाडता आला नाही. प्रचारादरम्यान पवारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगता सभेचे पाठबळ मिळाले. मात्र, इतरवेळी त्यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारता आली नाही. सातारा शहर व परिसरातील अनेक बूथवर राष्ट्रवादीला कार्यकर्तेही मिळाले नाहीत. त्यामुळे मतदानापूर्वी अंतिम दोन दिवस मते मिळतील, असे वातावरण निर्माण करण्यास ते अपयशी ठरले.
 
शिवेंद्रसिंहराजेंनी मात्र, स्वत: सकाळच्या सत्रात सातारा शहरासह जावळीतील बहुतांश गावात पदयात्रा काढल्या. साताऱ्यातील पदयात्रेत उदयनराजे भोसले गटालाही बरोबर घेतले. दुपारनंतर त्यांनी प्रचार सभांवर नेटाने भर दिला होता. त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनीही प्रचारासाठी कंबर कसली होती. सातारा शहर, शेंद्रे, लिंब गटासह जावळीतील काही भागांत त्यांनी कोपरा सभांचा धडाका लावला. उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंना बरोबर घेऊन त्यांनी अनेकदा महिला मेळावेही घेतले. या प्रचारादरम्यान त्यांनी नवीन एमआयडीसी, रोजगार निर्मिती, सातारा शहराचा विकास, रस्ते, बोंडारवाडी प्रकल्प आदी मुद्‌द्‌यांसह विकासकामांसाठी भाजपमध्ये गेलो असल्याचे जनतेला पटवून दिले. या मुद्‌द्‌यांचा प्रभाव निवडणुकीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे.
 
शिवेंद्रसिंहराजेंना विरोध म्हणून एकत्रित आलेल्या दीपक पवार, माजी आमदार सदाशिव सपकाळ, भाजपचे अमित कदम यांच्यातील श्री. सपकाळ, श्री. कदम यांना आपलेसे करण्यात शिवेंद्रसिंहराजेंनी यश मिळविले. शिवाय, महायुतीचे घड बांधत त्यांनी प्रचार केला. त्याचा फायदा शिवेंद्रसिंहराजेंना झाल्याचे दिसून आले. मात्र, 2014 मध्ये पवारांच्या विरोधात शिवेंद्रसिंहराजेंना 47 हजार 713 इतके मताधिक्‍य मिळाले होते, ते या निवडणुकीत राखता आले नाही. 

- अशी आहेत मते 
एकूण मते माेजली - 199849

शिवेंद्रसिंहराजे - 118005 मते
दीपक पवार - 74581
अशाेक दिक्षीत (वंचित बहुजन आघाडी) 3154
शिवाजी भाेसले - 947
अभिजीत बिचुकले - 759
विजयानंद शिंदे - 425
नाेटा - 1978
(संदर्भ निवडणुक विभाग संकेतस्थळ रात्री साडे नऊ पर्यंत) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Satara final result BJP Won