esakal | महात्माजींच्या हयातीत संकल्प; मृत्यूपश्‍चात साकारला पुतळा!
sakal

बोलून बातमी शोधा

महात्माजींच्या हयातीत संकल्प; मृत्यूपश्‍चात साकारला पुतळा!

महात्माजींच्या हयातीत संकल्प; मृत्यूपश्‍चात साकारला पुतळा!

sakal_logo
By
जयसिंग कुंभार,

सांगली : सांगलीच्या स्टेशन चौकातील महात्मा गांधींचा पुतळा समस्त आंदोलकांचे आश्रयस्थानच. हा पुतळा सांगलीतील शिल्पकार दत्तोपंत ओतारी यांनी बनवला. आयुष्यातील त्यांचा हा पहिलाच पुतळा आणि तोही वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी बनवलेला. कोल्हापूरचे प्रसिद्ध शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या या पुतळ्याचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तोंडभरून कौतुक केले होते. गेली सत्तर वर्षे हा पुतळा सांगलीकरांना प्रेरणा देत आहे.

महात्मा गांधी यांच्या या पुतळ्यासाठी पायाचा दगड बापूंच्या हयातीतच बसवण्यात आला. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सहाव्या दिवशीच म्हणजे २१ ऑगस्ट १९४७ रोजी बसवण्यात आला. सांगलीचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ते हा दगड बसवण्यात आला. मात्र या पुतळ्याचे अनावरण गांधीजींच्या मृत्यूनंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजे २४ फेब्रुवारी १९५१ रोजी तत्कालीन मुंबई महापालिकेचे महापौर स. का. पाटील यांच्या हस्ते झाले.

या पुतळ्याच्या उभारणीसाठी तत्कालीन सांगली नगरपरिषदेच्यावतीने तीन हजार रुपयांची देणगी दिली. तितकीच प्रत्येकी देणगी स्थानिक व्यापारी नारायण सर्वोत्तमदास, जी. बी. आरवाडे, गोविंदराम शोभाराम अशा अनेक व्यापाऱ्यांनी दिली. तत्कालीन सांगली बँकेनेही देणगी दिली होती. लोकवर्गणीतून लोकनेत्यांचा पुतळा उभा करण्याचा तोसुवर्णकाळ होता.

हा पुतळा उभा केला सांगलीच्या शिल्पकार दत्तोपंत ओतारी यांनी, दत्तोपंत सांगलीतील गावभागातील. आजही त्यांचे कुटुंबिय ओतकामाच्या विविध कलाकारच्या व्यवसायात आहे. दत्तोपंत म्हणजे अवलियाच. चित्रकारी, घडीव काम, ओतकाम, शिल्पकारी अशा सर्व कला त्यांना जणू जन्मजात अवगत. स्वातंत्र्यानंतरचे सांगलीचे पहिले तत्कालीन नगराध्यक्ष धोंडिराम थोरात यांनी आग्रहाने हा पुतळा दत्तोपंतच उभा करणार असा आग्रह धरून त्यांनी ही जबाबदारी दत्तोपंतांवर सोपवली. एका नवख्या शिल्पकारावर ही जबाबदारी सोपवण्याचे धाडस तत्कालीन नगराध्यक्षांनी केले. या पुतळ्याच्या मॉडेलला मुंबईच्या बॉटलीबॉय कंपनीने तत्काळ मंजुरी दिली. हे काम अचूक व्हावे यासाठी या पुतळ्याला फिनिशिंगसाठी किर्लोस्कर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अनंतराव फाळणीकरांनी जातीने लक्ष घातले होते.

या पुतळ्यानंतर पुढे दत्तोपंतांनी राज्यभरातील अनेक पुतळ्यांची कामे केली. बाबूराव पेंटर आणि दत्तोपंतांचा जुना स्नेह होता. त्या स्नेहातून बाबूरावांनी काम सुरू असताना दर आठ-पंधरा दिवसांला कोल्हापुरातून येऊन भेटी देत मार्गदर्शन केले. सुमारे दोनशे किलो ब्रॉंझचा या पुतळ्यासाठी वापर करण्यात आला.

अग्निहोत्री छत्रे बनले मॉडेल!

या पुतळ्यासाठी जिवंत मॉडेल म्हणून ओतारी यांचे शेजारी अग्निहोत्री छत्रे यांना तासन् तास घरीत बसवून घेण्यात आले. त्यांचा चेहरा आणि देहबोली महात्मा गांधींप्रमाणेच होती. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली होती, असे दत्तोपंतांचे चिरंजीव रामानंद ओतारी यांनी सांगितले. दत्तोपंतांनी साकारलेले अनेक पुतळे आणि मूर्ती राज्य आणि देशभरात आहेत. त्यांचे निधन २००३ मध्ये झाले. या मोठ्या कलावंताचा यथोचित गौरव मात्र सांगलीकरांकडून झाला नाही. अगदी त्यांनी साकारलेल्या गांधी पुतळ्याच्या चबुतऱ्यावरही त्यांचा नामोल्लेख नाही. या चबुतऱ्यावरील देणगीदारांची नावेही आता अस्पष्ट झाली आहेत. दत्तोपंतांचा मरणोत्तर गौरव म्हणून तरी या चबुतऱ्यावर नाव कोरायला हवे.

नेहरूंनीही दिली शाबासकी!

खरे तर दत्तोपंतांचा ओतकामाचा पारंपरिक व्यवसाय. मात्र या हुरहुन्नरी कलाकाराने पुतळ्याचे आव्हान पेलले. पुढे सांगली दौऱ्यावर आलेल्या पंडित नेहरुंनी आवर्जून या पुतळ्याला भेट दिली आणि ‘बहोत खूब’ अशा शब्दांत शाबासकीही दिली.

loading image
go to top