महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही : खडसे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी मंदिरातच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे जाणे म्हणजे त्यांची तुलना नव्हे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : केवळ सत्ता व स्वार्थासाठी एकत्र येऊन शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. त्यांचे तीन पायांचे अभद्रयुतीचे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केला. 
माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी मंदिरातच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे जाणे म्हणजे त्यांची तुलना नव्हे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली. 
यावेळी माजी मंत्री खडसे म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केवळ सत्ता हवी होती. सत्तेच्या हव्यासापोटी सर्व राजकीय नितीमूल्ये गुंडाळून त्यांनी केवळ भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी युती केली आहे. सरकारला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. या 50 दिवसांमध्ये प्रत्येक पक्षाने वेगवेगळी भूमिका मांडली आहे. त्यातून त्यांनी टीकाही केली आहे. सरकार चालवण्यासाठी त्यांची तीन पायांची शर्यत सुरू आहे. सरकार टिकवण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. परंतु त्यांचे हे विसंगत विचारांचे सरकार फार काळ टिकणार नाही असे भाकीत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचे मुखवटा लावण्यात आल्याच्या व्हीडीओ विषयी विचारले असता छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष होते. त्यांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. परंतु त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे किंवा विचारांचे अनुकरणे यात कोणतेही गैर नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील शेतकऱ्यांना सुखाचे आणि समृध्दीचे दिवस येवोत हेच साकडे आपण विठ्ठलाला घातल्याचेही माजी मंत्री खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.यावेळी शहरातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mahavikas aghadi government the will not last long