महेश यांच्या घराला ‘कमळा’चे ‘तोरण’

- डॅनियल काळे
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात पैशाचा महापूर आला असताना व जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढतीत गणल्या गेलेल्या शहरालगतच्या उचगाव गटातील सर्वसामान्य कुटुंबातील महेश चौगुले यांनी मिळविलेले यश पैसेवाल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन 
घालणारे आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात पैशाचा महापूर आला असताना व जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढतीत गणल्या गेलेल्या शहरालगतच्या उचगाव गटातील सर्वसामान्य कुटुंबातील महेश चौगुले यांनी मिळविलेले यश पैसेवाल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन 
घालणारे आहे. 

एका कारखान्यात कामगार म्हणून काम करणाऱ्या महेश यांची उमेदवारी लोकांनीच उचलून धरली. लोकवर्गणी काढून जमविलेला निधी महेश यांना दिला आणि त्यांनी पायाला भिंगरीच बांधली. गेले दहा-बारा दिवस मतदारसंघ पिंजून काढल्यानेच महेश यांच्या यशाचा मार्ग मोकळा झाला. भारतीय जनता पक्षाने गरीब कुटुंबातल्या महेश यांना उमेदवारी देण्याचे धाडस केले आणि शुभकार्यात घराला तोरण बांधणाऱ्या मावशीच्या मुलाने निवडणुकीत मुसंडी मारली.

जिल्ह्यात निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होत आहे. शहरालगतचे उचगाव हे मोठे गाव. उचगाव मतदारसंघात उचगाव, गांधीनगर व सरनोबतवाडी तीन महत्त्वाची गावे येतात. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यामुळे येथे मागासवर्गीय उमेदवारांचा शोध सुरू झाला.

पक्षासाठी आणि गटासाठी नेहमी राबणाऱ्या इच्छुकांच्या नावातून महेश चौगुले व नितीन कांबळे यांच्या नावाचा विचार सुरू झाला. यामधून अखेर महेश चौगुले यांना भाजपने उमेदवारी देण्याचे धाडस दाखविले. पक्षाने थेट जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्याने महेशने मोठ्या उत्साहाने प्रचाराला सुरवात केली. प्रचारात त्यांनी जोरदार मुसंडी मारली. महेश चौगुले यांनी पायाला भिंगरी बांधून दिसेल त्या मतदारांचे पाय धरायचे, हातात हात द्यायचा आणि मावशी, काका, मामांचा आशीर्वाद घ्यायचा, हेच सूत्र ठेवले. त्यामुळे महेश यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. निवडणूक म्हटले, की पैशाचा वापर आलाच. महेश यांची परिस्थिती गरिबीची. वडील गवंडी काम करतात, तर आई गृहिणीच आहे. महेश चौगुले हे मातंग समाजातले. गावात वास्तुशांती, विवाह समारंभ असला, की महेश यांची आई घरांना तोरण बांधण्याचे काम करते. या मावशीचा मुलगा आज जिल्हा परिषद सदस्य झाला आहे. एका गरीब कुटुंबातल्या मुलाला जिल्हा परिषदेवर जाण्यासाठी ते काम करत असलेल्या कोल्हापूर स्टीलमधील कामगारांनी तसेच गावातल्या काही तरुण मंडळांनी, कार्यकर्त्यांनीही पैशाची मदत केली.

लोकांनी महेश यांची उमेदवारी उचलून धरल्यानेच त्यांचा विजय सुकर झाला. महेश यांच्या विजयात गावातील प्रमुख कार्यकर्ते राजेंद्र संकपाळ, अनिल शिंदे, रवींद्र एडके, नामदेव वाईंगडे यांच्यासह टीम भाजपचा वाटा आहे.

पंचायत समितीत काँग्रेसचा विजय
उचगाव पंचायत समितीत काँग्रेसचे सुनील पोवार यांनी विजय मिळविला. गतवेळच्या जिल्हा परिषदेत व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने या जागा जिंकल्या होत्या. आमदार सतेज पाटील यांच्या गटानेही ताकद लावली होती. या वेळी उचगाव मतदारसंघातील गांधीनगरमधून त्यांना प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी मते मिळाल्याने जिल्हा परिषदेचे उमेदवार सतीश भोसले यांचा पराभव झाला. सतेज पाटील यांच्या दृष्टीने ही जागा प्रतिष्ठेची होती; पण जिल्हा परिषद हातातून निसटली. पंचायत समिती मात्र त्यांनी कायम राखली. आमदार सतेज पाटील गटाच्या काँग्रेसच्या सरपंच सुरेखा चौगुले, कावजी कदम, मधुकर चव्हाण, महेश जाधव, दिनकर पोवार, कीर्ती मसुटे, अशोक निगडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

Web Title: mahesh chaugule win in zp election