मका तरारला... पण ही अळी पळवतेय शेतकऱ्याच्या तोंडचा घास...

सदाशिव पुकळे
Wednesday, 15 July 2020

तलाव, विहिरींना पाणी चांगल्याप्रकारे असल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी केली आहे. कमी कष्टामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळते व मका विक्रीपासून चार पैसेही मिळतात. त्यामुळे शेतकऱ्याला आशा लागून राहिली होती.

आटपाडी (जि . सांगली) : आटपाडीच्या पश्‍चिम भागामध्ये यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने, तलाव, विहिरींना पाणी चांगल्याप्रकारे असल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी केली आहे. कमी कष्टामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळते व मका विक्रीपासून चार पैसेही मिळतात. त्यामुळे शेतकऱ्याला आशा लागून राहिली होती; मात्र या पिकाला मागील वर्षापासून लष्करी अळीची दृष्ट लागल्याने शेतकरी हैराण झाला आहे. 

पूर्वी मका पेरल्यानंतर पाणी देणे, कोळपणी करणे व खतांचा डोस दिल्यानंतर मका काढणीसाठी येत होता; परंतु मागील वर्षापासून मका पिकावरील लष्करी अळीचा त्रास होऊ लागला आहे. फवारणी करून शेतकरी कोकदम्याला आला आहे. लष्करी अळी थांबवण्यासाठी फवारणी करणे, सापळे तयार करणे, असे अनेक प्रयोग शेतकरी करीत आहे; मात्र लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्‍यातून पांढरं सोनं "कापूस' नामशेष झाला आहे, आता मक्‍याचीही तीच गत होते की काय? अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागली आहे. 

आटपाडी तालुक्‍यात कापूस उत्पादक शेतकरी भरपूर प्रमाणात होते. प्रत्येक शेतकरी कापूस करीत होता त्याच्यापासून चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळून शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते; परंतु बनावट बियाणांमुळे कापूस तालुक्‍यातून नामशेष झाला. त्यानंतर शेतकरी मका उत्पादनाकडे वळला, परंतु त्यालाही लष्करी अळीची दृष्ट लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी राहुल केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम भागात कृषी विभागाची टीम शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन औषध फवारणीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामध्ये कृषी सहायक रामदास ढवळे, तुकाराम माने, संजय काळेल, रवींद्र घुटूकडे, कृषी पर्यवेक्षक कमलेश घोडके यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी रोखण्यासाठी मार्गदर्शन सुरू केले आहे. 

कृषी विभागाचे उपाय... 
प्रथमतः शेतकऱ्यांनी मका पिकामध्ये एकरी 5 फेरोमन ट्रॅप लावावेत. पक्षी थांबे एकरी 7 ते 8 उभे करावेत. सर्वप्रथम वनस्पतीजन्य कीटकनाशके, 5% निंबोळी अर्क किंवा 1500 पी. पी. एम. निमारक 5 मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे सकाळी किंवा सायंकाळी पोंग्यामध्ये फवारणी करणे. अळी नियंत्रणात नाही आल्यास एमामेकटीन बंझो एट 4 ग्रॅम. प्रती 10 लिटर पाण्यातून रासायनिक फवारणी करा, अशा उपाययोजना कृषी विभागाने सुचवल्या आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maize infected by this worms, Farmers getting loss in the crop at Atpadi