द्राक्षबागांचे छाटणीनंतर पंचनामे करा; बागायतदार संघाची मागणी

बलराज पवार
Sunday, 1 November 2020

सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र नेमके किती नुकसान झाले आहे ते छाटणीनंतरच समजणार आहे.

सांगली : जिल्ह्यातील द्राक्षबागांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र नेमके किती नुकसान झाले आहे ते छाटणीनंतरच समजणार आहे. त्यामुळे छाटणीनंतर सरसकट द्राक्षबागांचे पंचनामे करण्याची मागणी द्राक्षबागायतदार संघाने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. याबाबतचा निर्णय राज्यस्तरावर घ्यावा लागेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत द्राक्ष बागायतदारांची बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी उपस्थित होते. 

अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान केले आहे. ऑक्‍टोबरमध्ये सगळीकडेच अवकाळी पावसाने अतिवृष्टी झाली. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्‍यात परतीच्या पावसाने कहर केला होता. त्याचा फळबागांना फटका बसला. डाळिंब, द्राक्षबागांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

ज्या बागांतील फळे कुजले, त्यांचा पंचनामा झाला. मात्र पावसामुळे बागांची छाटणी झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान छाटणीनंतर समजणार आहे. बागांमध्ये पाणी आहे. त्यामुळे छाटण्या लांबल्या आहेत. छाटणीनंतरच द्राक्षबागांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी बागायतदार संघाच्यावतीने पालकमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली. 

पालकमंत्र्यांनी याबाबत कृषी आयुक्तांशी चर्चा केली, परंतु छाटणीनंतर पंचनाम्याबाबतचा निर्णय जिल्हास्तरावर घेता येणार नाही. नाशिक, नगर, सोलापूर जिल्हयातील द्राक्ष बागायतदारांचा विचार करावा लागेल. त्यामुळे फेर पंचनाम्याचा निर्णय राज्यस्तरावर घ्यावा लागेल, याबाबत विचार करण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Punchnama after cutting of grape yards; Demand for bagayatdar sangh