पाईपलाईन बाजूला करून रस्ता करा...

रवींद्र माने
Thursday, 4 March 2021

राष्ट्रीय महामार्गाखाली येत असलेली शहराची पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन बाजूला करण्यासाठी अखेर पालिका प्रशासन हलले. पाईपलाईन बाजूला करून रस्ता करावा, अशा आशयाचे पत्र पालिकेने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले.

तासगाव : राष्ट्रीय महामार्गाखाली येत असलेली शहराची पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन बाजूला करण्यासाठी अखेर पालिका प्रशासन हलले. पाईपलाईन बाजूला करून रस्ता करावा, अशा आशयाचे पत्र पालिकेने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. दोन वर्षापासून या प्रश्नाकडे कुणी लक्षच दिले नसल्याचे स्पष्ट झाले. 

तासगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी चक्क राष्ट्रीय महामार्गाखाली येत असल्याचे आणि भविष्यात 50 हजार लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता असल्याचे वृत्त "सकाळ' ने दिल्यानंतर आज पालिका प्रशासन हलले. ही पाईपलाईन बाजूला करण्याच्या फाईल वरील धूळ झटकण्यात आली. 

सन 2018 मध्ये पालिकेने पाईपलाईन येणाऱ्या रस्त्यातून बाजूला करण्याचा ठराव केला. मात्र त्यानंतर केवळ कागदी घोडे नाचवण्यात आले. आता थेट या पाईपलाईनवरच रस्त्याचे काम सुरू आहे. रोज पाईपलाईन फुटत आहे. ती दुरुस्त करून वर भराव टाकला जात आहे. एक पाईपलाईन पूर्ण रस्त्यात तर दुसरी पाईपलाईन सुमारे एक किलोमीटर रस्त्याखाली गेली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तरीही गेले काही दिवस प्रशासन केवळ फुटलेली पाईप दुरुस्त करण्याचेच काम करीत होते. भविष्यात रस्त्याखाली गेलेली पाईपलाईन फुटली तर शहराचा पाणीपुरवठा धोक्‍यात येऊ शकतो याचे गांभीर्य पदाधिकारी, प्रशासनालाही नव्हते. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पालिकेत झालेला पत्रव्यवहार आज समोर आला. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला पाईपलाईन रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी पत्र देण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाला दिली. कोणत्याही स्थितीत नागरिकांचे हित जपले जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आज शरद शेळके, खंडू कदम यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी श्री. पाटील यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. 
 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make the road by the side of the pipeline ...