कामे आधीच केली; आता निविदा होणार म्हणेज? वाचा काय आहे प्रकार

जयसिंग कुंभार
Tuesday, 8 September 2020

मिरज प्रभाग समिती चारमधील स्मशानभूमी व अन्य सुमारे 33 लाख रुपयांची कामे मॅनेज करण्याच्या महापालिकेत हालचाली सुरू आहेत.

सांगली ः मिरज प्रभाग समिती चारमधील स्मशानभूमी व अन्य सुमारे 33 लाख रुपयांची कामे मॅनेज करण्याच्या महापालिकेत हालचाली सुरू आहेत. यातील अनेक कामे आधीच झाली असून, प्रभाग समिती स्तरावरच तीन लाखांच्या आतील अंदाजपत्रक तयार करून ती परस्पर करण्यात आल्याचे समजते. 

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्याचे मुरमीकरण (2.99 लाख), स्मशानभूमीचे बॅरिकेटिंग (2.99 लाख), स्मशानभूमीला चेनलिंक कंपाउंड करणे (2,95 लाख), कर्मचाऱ्यासाठी निवारा शेड बांधणे, स्मशानभूमीसाठी फाउंडेशन ग्राउंड बीम तयार करणे, स्मशानभूमीसाठी बेड कॉंक्रिट करणे (2.97 लाख), स्मशानभूमीत दहन कट्टे बांधणे (2.93 लाख), स्मशानभूमीसाठी शौचालय बसवण्यासाठी फाउंडेशन बेस तयार करणे (2.99 लाख) अशी एकूण 9 कामे केवळ स्मशानभूमीचीच आहेत. या सर्वच कामांची निविदा काढायची झाली, तर स्थायीची मान्यता घ्यावी लागली असती. ती टाळण्यासाठी या सर्व कामांचे तीन लाखांच्या आतील रकमेचे तुकडे करण्यात आले. ही कामे सांगलीतील प्रशासनाच्या मर्जीतील काही नगरसेवकांनीच घेतली. कोविडच्या टाळेबंदीच्या कामात घाईगडबडीत ही कामे उरकूनही टाकली. आता यावर तक्रारी होणार, असे दिसताच त्याच्या निविदांची प्रक्रिया राबवण्यात आली. प्रभाग समिती अधिकारी स्तरावर या कामांची मंजुरीची प्रक्रिया असल्याने त्यासाठीचे निविदा अर्ज मागवण्यात आले. 

आज सायंकाळी पाचपर्यंत अर्ज न्यायची मुदत होती. हे अर्ज दिले जाऊ नयेत, यासाठी बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांवर संबंधित नगरसेवक दडपण आणत होते. तरीही अनेक ठेकेदारांनी अर्ज नेले. उद्या सायंकाळी पाचपर्यंत अर्ज भरायची मुदत आहे. आता झालेल्या कामाची मंजुरी प्रशासन कसे देते, याबाबत कुतूहल आहे. 

गणेशोत्सवातील उधळपट्टी 
गणेशोत्सव काळातील दोन कामेही या यादीत घुसडली आहेत. मिरजेतील गणेश तलावाच्या उत्तर बाजूची भिंत बसवणे (2.89 लाख) आणि विसर्जन कुंड व मूर्ती दान केंद्राजवळ ग्रीड टाकणे (2.99 लाख) अशी अव्वाच्या सव्वा किमतीची दोन कामेही घुसडली आहेत. या किमतीत किमान अडीच, पावणेदोनशे ब्रास मुरुम ग्रीड टाकले जाऊ शकते. 

चौकशी करून बिले रोखा
आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यावश्‍यक कामे विना निविदा केली जाऊ शकतात. दहन कट्टे सोडले, तर अन्य कामे तातडीची नाहीत. एकत्रित निविदा का काढली नाही? आधीच कामे केली असतील, तर त्यांची चौकशी करून संबंधित बिलेही रोखली पाहिजेत. 
- उत्तम साखळकर, विरोधी पक्षनेते महापालिका 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manage tenders for works at Miraj Cemetery? Already completed works