कोविड हॉस्पिटलसाठी कोल्हापूर रोडवरील मंगल कार्यालयाची जागा शक्‍य

बलराज पवार
Tuesday, 11 August 2020

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या कोविड हॉस्पिटलसाठी कोल्हापूर रोडवरील मंगल कार्यालयाची जागा निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे.

सांगली : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या कोविड हॉस्पिटलसाठी कोल्हापूर रोडवरील मंगल कार्यालयाची जागा निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या जागेची पाहणी केली आहे. उद्या (मंगळवारी) महापौरांसह महापालिका पदाधिकाऱ्यांना ही जागा दाखवण्यात येणार आहे. त्यांच्याशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली आहेत. मात्र तेथे रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शिवाय खासगी रुग्णालयांची भरमसाठ बिलांमुळे होणाऱ्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे स्वत:चे शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे हॉस्पिटल तातडीने युध्दपातळीवर उभारण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करणार आहे. 

महापालिकेत खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी 500 खाटांचे रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. त्यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था असलेले 100 खाटांचे रुग्णालय तातडीने उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आज शहरातील काही जागांची पाहणी केली. यामध्ये विशेष करुन मंगल कार्यालयांच्या परिसराची पाहणी केली. ऑक्‍सिजन बेडच्या सुविधेसह कोरोना रुग्णांना आवश्‍यक उपचार तेथे मिळण्याच्या दृष्टीने सोयी करण्यात येणार आहेत. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangal office space on Kolhapur Road is possible for Kovid Hospital