
सांगली- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा आवक वाढत असतानाच विष्णूअण्णा फळमार्केटमधील आंबा विक्रीवर गर्दीमुळे सावट आले होते. परंतू व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला विनंती केली. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते याची जाणीव करून दिली. त्यामुळे आता फळ मार्केटमध्ये पोलिस बंदोबस्तात आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, बॅरिकेटस्मध्येच आंबा विक्री गुरूवार (ता.23) पासून होणार आहे.
कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये आंबा खरेदीसाठी विक्रेत्यांबरोबर थेट ग्राहक गर्दी करू लागले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्याबाबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. गर्दी होत असताना अनेकजण मास्कचा वापर देखील करत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फळमार्केटमध्ये धाव घेऊन आंबा विक्री बंद पाडली. फळमार्केटसमोरील आदिसागर मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये आखणी करून तेथे आंबा विकण्यास सांगितले. परंतू तेथे जागा अपुरी असल्यामुळे तसेच सुविधांचा अभाव असल्यामुळे व्यापाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे मंगळवारी तेथे आंबा विक्री झाली नाही. शेतकऱ्यांना परस्पर माल विकावा लागला. आज दुसऱ्या दिवशीही तेथे आंबा विक्रीला प्रतिसाद मिळाला नाही.
फळ मार्केटमध्येच आंबा विक्रीला परवानगी मिळावी म्हणून व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतू चर्चा होऊ शकली नाही. आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याशी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी चर्चा केली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा आवक अधिक होते. विक्री नाही झाली तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते हे समजावून सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी अधीक्षक शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अधीक्षक शर्मा यांनी पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांना फळमार्केटमध्ये सुरक्षित आंबा विक्री कशी करता येईल? याबाबत लक्ष घालण्यास सांगून सूचना केल्या. त्यानुसार उपाधीक्षक वीरकर, निरीक्षक अजय सिंदकर आदींनी सायंकाळी फळमार्केटला भेट दिली. तेथे व्यापाऱ्यांना बॅरिकेटस् मारून दिले. फळमार्केट प्रशासनाने केवळ खरेदीदार आणि अडते यांनाच आतमध्ये सोडावे अशा सूचना दिल्या. किरकोळ ग्राहक आतमध्ये गर्दी करणार नाहीत याची खबरदारी घेण्यास सांगितले. त्यामुळे गुरूवारपासून पोलिस बंदोबस्तात सकाळपासून आता आंबा विक्री होणार आहे. सौदे न काढता गर्दी टाळून आंबा विक्री होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.