Vidhan Sabha 2019 ' माण ' ला आमचं ठरलंयचा उमेदवारच बदलला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

आज (सोमवार, सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

सातारा : माण -खटाव मतदारसंघात गोरे बंधूंना आता प्रभाकर देशमुख यांचे आव्हान असणार आहे हे आज (सोमवार) निश्‍चित झाले आहे. माण -खटाव विधानसभा मतदारसंघात आज (सोमवार, सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, संदीप मांडवे या प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता येथे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर विद्यमान आमदार जयकुमार हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तसेच भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना सहकार्य केले. रणजितसिंह यांना खासदार करण्यात गोरेंचा महत्त्वपूर्ण वाटा मानला जातो.जयकुमार गोरे हे भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दोघांनीही पक्षाने दिलेल्या एबी (अधिकृत पत्र) फॉर्मद्वारे उमेदवारी अर्ज भरला आहे.

दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षाने एकत्रित येऊन गोरे बंधू विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता. प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना देसाई यांची उमेदवारी मान्य नव्हती. देशमुख यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत देशमुख यांनी निवडणुक लढवावीच अशी भुमिका कार्यकर्त्यांनी घेतली. देशमुख यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर देशमुख यांना उमेदवारी अर्ज भरावा लागला.

त्यापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे ही माणमधील काही नेत्यांनी देशमुख यांच्या नावाचा आग्रह धरला होता.या मतदारसंघात अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख या तिघांनी एकत्रित शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज भरला होता.

आज (सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी पुर्वी सर्वानुमते ठरलेला उमेदवार बदलण्यात आला. अनिल देसाईन, रणजितसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता या निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे (भाजप), शेखर गोरे (शिवसेना) यांना प्रभाकर देशमुख यांचे आव्हान असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Mann' constituency candidate changed