बॅंकांच्या अनेक मशीन कित्येक दिवसांपासून धुळखात

अजित कुलकर्णी 
Thursday, 17 September 2020

एटीएमसह इतर मशीन सध्या शो पीस बनल्याची अवस्था आहे. गणपती मंदिराशेजारील मुख्य शाखेतच हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे.

सांगली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएमसह इतर मशीन सध्या शो पीस बनल्याची अवस्था आहे. गणपती मंदिराशेजारील मुख्य शाखेतच हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. पैसे भरण्यासह पासबुकावर ताजा तपशील छापण्यासाठीची मशीन अक्षरश: कित्येक दिवसांपासून धुळ खात पडून आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 

शहरातील अनेक बॅंकांना कोरोनाचा फटका बसला आहे. बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित होउ लागल्याने काम बंद ठेवण्याची वेळ येत आहे. त्यामुळे लोकांचे ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने गेल्या सहा महिन्यात डिजीटल पेमेंटला पसंती देण्यात येत आहे.

डिजीटल पध्दतीने व्यवहार होत असले तरी पैशांच्या आदान-प्रदानाचे तपशील पासबुकावर कळतात. त्यामुळे पासबुक भरण्यासह पैसे अन्य खात्यावर पाठवण्यासाठी मशीनवर ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, उद्योजकांची गर्दी असते. मात्र शहरातील अनेक एटीएम मशीन नादुरुस्त अवस्थेत तर पासबुक भरण्यासाठीचे मशीनही निकामी झाले आहेत. तसे फलक लावण्यापलीकडे बॅंक प्रशासन काहीच करत नाही.

ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे बॅंका जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. सिव्हिल हॉस्पिटल चौकात असणाऱ्या बॅंकांच्या एटीएममध्ये अक्षरश: कचरा भरलेला असतो. एटीएम सेंटर म्हणजे कचरा कोंडाळे असल्याचे सर्रास चित्र दिसते. मात्र काही बॅंकाच्या एटीएमबाहेर सुरक्षारक्षक तैनात केल्याने शिस्त, स्वच्छता कटाक्षाने पाळली जाते. मात्र अशी मोजकीच सेंटर असल्याने साहजिकच ग्राहक तेथे पसंती देतात. 

गणपती मंदिराशेजारी स्टेट बॅंकेच्या एटीएम सेंटरवर रोज गर्दी असते. पैसे भरण्यासह पासबुक भरण्याच्या मशीन बहुतांश वेळा बंद असतात. काहीवेळा तांत्रिक बिघाड झाल्याची कारणे सांगून बॅंक प्रशासन जबाबदारी झटकते. ज्येष्ठ नागरिकांसह पेन्शनर, उद्योजकांची बॅंकांच्या अडेलतट्टूपणामुळे गैरसोय होत आहे. शिवाय हेलपाटे मारण्याचा होणारा मनस्ताप वेदनादायी आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही दाद घेतली जात नाही. याकडे गांभिर्याने लक्ष देउन ग्राहकांची सोय करावी. बॅंकांनी तात्काळ कार्यशैली न बदलल्यास तीव्र आंदोलन पुकारु. 
- मयूर घोडके, शहरप्रमुख शिवसेना, सांगली  

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many banks' machines have been in disrepair for days