वेश्‍यांच्या कमाईवर जगण्याचा राजरोस उद्योग

घनशाम नवाथे 
Saturday, 30 January 2021

सांगली शहराबाहेरील हॉटेल रणवीरमध्ये पोलिसांनी छापा टाकून "हाय प्रोफाईल' वेश्‍या अड्डयाचा पर्दाफाश केला. छाप्यावेळी ग्राहक बनून आलेला पोलिस निरीक्षक सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

सांगली : शहराबाहेरील हॉटेल रणवीरमध्ये पोलिसांनी छापा टाकून "हाय प्रोफाईल' वेश्‍या अड्डयाचा पर्दाफाश केला. छाप्यावेळी ग्राहक बनून आलेला पोलिस निरीक्षक सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या छाप्यामुळे शहरातील हॉटेल्स आणि लॉजमध्ये चालणारा वेश्‍या व्यवसाय चव्हाट्यावर आला आहे. वेश्‍या व्यवसायाची पाळेमुळे स्थानिक परिसरात रूजलेली नसून पश्‍चिम बंगाल, बांगला देश, नेपाळच्या सीमेवरून थेट सांगलीच्या गल्लीबोळात वेश्‍यांना विविध मार्गांचा अवलंब करून आणले जाते. त्यामुळे हे "नेटवर्क' उद्‌ध्वस्त करण्याची गरज आहे. 

सांगली शहरातील दोन उपनगरापुरता मर्यादित असलेला वेश्‍या व्यवसाय गेल्या काही वर्षांत चांगलाच फोफावला आहे. काही वर्षांपर्यंत जिल्ह्याच्या सीमेपलीकडील कर्नाटकातून अल्पवयीन मुलींना या व्यवसायात आणले जात होते. त्याचा पर्दाफाश पोलिसांच्या कारवाईतून झाला. परंतु वेश्‍या व्यवसाय हा दोन उपनगरातून गेल्या काही दिवसांत बाहेर पसरला आहे. शहरातील अनेक फ्लॅट व हॉटेल, लॉजेसचा वेश्‍या व्यवसायासाठी वापर होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. 

सांगली परिसरातील काही हॉटेल्स आणि लॉजेसचा वापर केवळ वेश्‍या व्यवसायासाठीच केला जातो. चोरीछुपे चालणारा व्यवसाय स्थानिक लोकांना माहीत असतो. तसेच बऱ्याचदा पोलिसांना देखील माहीत असतो. परंतु पोलिस त्याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करतात. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडून अधूनमधून कारवाया होतात. परंतु स्थानिक पोलिस कारवाईत अग्रेसर नाहीत. वेश्‍या व्यवसाय गेल्या काही वर्षात "हाय प्रोफाईल' बनला आहे. हॉटेल व लॉज चालत नसेल तर तेथे वेश्‍यांना आणून गैरमार्गाने कमाई करण्याचा उद्योग काहीजण करतात. हॉटेल मालक, व्यवस्थापक, दलाल आणि ग्राहक यांची साखळी निर्माण होते. हे सर्वजण वेश्‍यांच्या शरीरविक्रीच्या कमाईवर पोसले जातात. 

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल मालकांनी पश्‍चिम बंगाल, बांगला देश, नेपाळ, हैदराबाद आदी भागातून वेश्‍यांना व्हाया मुंबई, सांगलीत आणले आहे. सांगलीत गेल्या काही वर्षांत हॉटेल्सवर पडलेल्या छाप्यात परप्रांतातील वेश्‍या येथे आणल्याचे स्पष्ट झाले आहे. साम, दाम, दंड आणि भेद या मार्गाचा अवलंब करून तरुणींना जाळ्यात ओढून वेश्‍या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जाते. वेश्‍या वस्तीतही काही परप्रांतीय तरुणींना आणले जात असल्याचे कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. 

पोलिस कारवाईत हॉटेल मालक, व्यवस्थापक, दलाल आणि ग्राहकांवर कारवाई होते. छाप्यात सापडलेल्या तरुणींची सुटका करून त्यांना सुधारगृहात सोडले जाते. त्यानंतर या तरुणींचे पुढे काय होते? हे समजत नाही. परंतु मोठ्या शहरातून सांगलीत वेश्‍यांना आणून त्यांच्या कमाईवर जगण्याचा उद्योग अनेक हॉटेल व लॉज मालक करतात. शहरात आणि उपनगरात अनेक हॉटेल्स, लॉजेसमध्ये केवळ हाच उद्योग चालतो. स्थानिक पोलिस ठाण्यांकडून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्‍यक आहे. 

कायद्यात शिक्षेची तरतूद- 
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन तो न्यायालयात सिद्ध झाल्यास वेश्‍यांच्या कमाईवर जगणाऱ्यांना सात वर्षांपासून ते दहा ते 14 वर्षांपर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. परंतु पळवाटा आणि कच्चे दुवे शोधून संशयित आरोपी यातून सहिसलामत सुटतात असे दिसून येते.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many people openly living on the earnings of prostitutes in Sangali