'आर्थिकदृष्ट्या समाज सक्षम होईल तेव्हाच मराठा क्रांती मोर्चे सार्थकी'

'आर्थिकदृष्ट्या समाज सक्षम होईल तेव्हाच मराठा क्रांती मोर्चे सार्थकी'

कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.

सकल मराठा समाजातर्फे झालेल्या कृतज्ञता मेळाव्यात श्री. राणे बोलत होते. उच्च न्यायालयाने १२ ते १३ टक्के मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सकल मराठा समाजातर्फे सत्कार झाला.

आरक्षणाच्या लढाईत पहिल्यापासून सक्रिय सहभागी असलेले नारायण राणे उपस्थित होते. या वेळी महसूलमंत्री पाटील यांनी, ‘सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण निश्‍चितपणे टिकेल. आरक्षणासाठी आपण मेहनत घेतली त्यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नव्हता,’ असे सांगून आरक्षणामुळे ज्या ज्या सुविधा मराठा समाजाला मिळणार आहेत, असे नमूद केले. 

राणे म्हणाले, ‘‘ज्या मराठा समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजासाठी काही तरी केले याचा निश्‍चित अभिमान आहे. मी माझी नैतिक जबाबदारी पार पाडली. मराठा समाजासाठी ज्यांनी एकजूट दाखवली, लढा देत राहिले, त्यांनीच राज्य शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. इतिहासात अनेक मोर्चे झाले; पण राज्यातील असा मराठा क्रांती मूक मोर्चा यापूर्वी कधी पाहिला नव्हता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकीर्दीत माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. माझ्या अध्यक्षपदाचे नाव अजित पवार यांनी सुचवले. मराठा आरक्षणासंबंधी ४० वर्षे झालेल्या आंदोलनाची जाणीव होती. त्या क्षणी मी निर्धार केला, की आता मागे हटायचे नाही. पुरोहित नावाच्या अधिकाऱ्यांसह अन्य टीमची चांगली साथ मिळाली. राज्यभर दौरे केले. तज्ज्ञांना भेटलो. काहींचा विरोधही जाणून घेतला. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य कोणाचेही आरक्षण काढले जाणार नाही याची काळजी घेतली. ५२ टक्के आरक्षण द्यायचे तर कसे द्यायचे, असा प्रश्‍न होता. तमिळनाडूमधील एका ९६ वर्षांच्या वकिलांनी आम्हाला मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या १५ (४) आणि १६ (४) या कलमांमध्ये एखाद्या समाजाचे सामाजिक तसेच शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाल्यास आरक्षण देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, असे नमूद केले आहे. त्यासाठी सर्व्हे होणे महत्त्वाचे होते. १६ टक्के आरक्षणासंबंधी कायदेशीर बाबी तपासल्या. त्यावेळचा अहवाल हा काही घाईगडबडीने झालेला नव्हता. मंत्री विनोद तावडे यांनी आम्हाला पत्र दिले तेही आम्ही स्वीकारले. सरकार बदलले, आरक्षण थांबले. यामध्ये काही तांत्रिक बाबींचा समावेश होता. प्रतिज्ञापत्र मुदतीत देऊ शकलो नाही. शेवटचा मराठा मोर्चा मुंबईत झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देणार असा शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला. ४० वर्षांची मेहनत कामी आली. राज्यात मराठा समाज हा ३४ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. यामध्ये शेतकऱ्यांसह काही समाजबांधव अजूनही दुबळे आहेत. त्यांना सबल करण्याचे काम करावे लागेल. मराठा आरक्षणासाठी आपण अनेकांचा वाईटपणा घेतला. मंत्रिमंडळातही विरोध झाला. सत्कार हा गुणांचा होत असतो. आता यापुढे सर्वच क्षेत्रांत मराठा समाजाने प्रगती करणे महत्त्वाचे आहे. ती नैतिक जबाबदारी आपली आहे. अधिकारी वर्गात मराठा समाजाचा टक्का कमी आहे, तोही वाढवावा लागेल.’’  

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘मराठा समाजाने आता सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले, नेतृत्व केले, ती जबाबदारी मराठा समाजाने पार पाडावी. आता आपल्याला मागे राहून चालणार नाही. अडचणींचा सामना करून आपण त्यातून बाहेर पडलो. मराठा समाजाने नुसते राजकारणाकडे न पाहता अन्य क्षेत्रांतही लक्ष घालावे.’’ 

तत्पूर्वी झालेल्या भाषणात आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘मराठा क्रांती मोर्चाने शांततेचे दर्शन घडवले. चंद्रकांतदादांचा जरी मी विरोधक असलो तरी त्यांचे मी अभिनंदन करतो. आरक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने नारायण राणे यांनी घातला. मराठा समाज हा आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे त्यांनीच सिद्ध केले. उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी वकिलांची फौज तयार करावी.’’ 

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘हा ऐतिहासिक असा निर्णय आहे. अण्णासाहेब पाटील यांच्यापासून शशिकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वांनीच मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या कामी समन्वय साधला. आता मराठा भवनाचा एक प्रश्‍न कोल्हापुरात आहे. त्यासाठी रेडीरेकनरने जागा घेण्याची आमची तयारी आहे.’’ 

आमदार नरके म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या आंदोलनावेळी पक्ष, संघटना, जात, पात असे मतभेद बाजूला राहिले आणि एक मराठा लाख मराठा या वृत्तीने मराठा समाज पुढे आला. त्याला इतर समाजबांधवांनी पाठिंबा दिला. ही ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.’’ 

आमदार हाळवणकर म्हणाले, ‘‘राजकीय व्यवस्थेने मराठा समाजाला विस्थापित ठेवले. यातून मराठा समाजाच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला. तेव्हा समाज मूक मोर्चा काढून रस्त्यावर आला. मराठा समाजाची आरक्षणाची रास्त मागणी पटल्यामुळेच बारा बलुतेदार समाजघटकांनीही मराठा आरक्षण मोर्चाला पाठिंबा दिला.’’  

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळाले. सर्वच समाजबांधवांनी यासाठी प्रयत्न केले. आरक्षण टिकण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी खूप प्रयत्न केले. यासाठी मी शासनाचे अभिनंदन करतो.’’ 

जयेश कदम म्हणाले, ‘‘कोपर्डीच्या ताईने जे बलिदान दिले त्यामुळेच मराठा समाज जागा झाला. अन्य समाजाने त्याला पाठिंबा दिला. मोर्चे, आंदोलने या माध्यमातून लढाईची व्याप्ती वाढत गेली. शाहू महाराजांनी आम्हाला मानसिक आधार दिला.’’ 

दिलीप पाटील म्हणाले, ‘‘इतिहास संशोधक, सरकार, लोकप्रतिनिधी या सर्वांचेच आरक्षण मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. मुंबईत मराठा वकिलांनी आपली प्रॅक्‍टिस बंद करून, पदरचे पैसे घालून हा किल्ला लढवला. कौन्सिल उभे केले. मंत्री समितीनेही बैठका घेतल्या. आरक्षणामुळे आता साडेचार कोटी मराठा समाज जुन्या वैभवाला जाईल याची मला निश्‍चित खात्री आहे.’’ 

प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापुरात अभूतपूर्व असा मराठा क्रांती मूक मोर्चा झाला. राजकारणी मंडळी असल्याशिवाय आंदोलने यशस्वी होत नाहीत त्यामुळे त्यांनाही समाविष्ट करून घेतले. कोपर्डीच्या घटनेने आरक्षणाच्या मागणीचा स्फोट झाला.’’ 

गणी आजरेकर, राजू मेवेकरी यांचा सत्कार 
मराठा क्रांती मोर्चाच्या सुरवातीपासून सक्रिय असलेले मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू मेवेकरी यांचा सत्कार झाला. व्यासपीठावरील उपस्थितांचाही सकल मराठा समाजाने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले. संदीप पाटील यांनी आभार मानले. 

शाहिरांना चांदीचे कडे 
शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंबंधी जनजागृती करणाऱ्या शाहीर दिलीप सावंत यांचा चांदीचे कडे देऊन सत्कार झाला. दिलीप देसाई आणि संजय वाईकर यांनी हे कडे दिले आहे. ‘मराठा आरक्षणाचा शब्द दादांनी खरा करून दाखवला,’ या पोवाड्यातील वाक्‍याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला.

एक मराठा, लाख मराठा 
‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेने सभागृह दणाणून गेले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाहेरही ढोल-ताशांच्या कडकडाटात पाहुण्यांचे स्वागत झाले.  

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर माधवी गवंडी, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, दिलीप पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शशिकांत पवार, प्रा. जयंत पाटील, जयेश कदम, बाबा पार्टे, सचिन तोडकर, राजू लिंग्रस, स्वप्नील पार्टे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com