...अन्‌ चिमण्यांना मिळाले हक्काचे घर

ravindra-shinde.
ravindra-shinde.

सातारा - चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत म्हणतच बहुतेकाचे बालपण गेले. मात्र, अंगणात येणारी चिमणी निदान शहरी भागातून तरी लुप्त होऊ लागली होती. या चिमण्यांना सिमेंटच्या जंगलात हक्काचे घर मिळावे, म्हणून साताऱ्यातील रवींद्र शंकरराव शिंदे हा अवलिया धडपडत आहेत. आजवर त्यांनी चिमण्यांच्या संवर्धनासाठी तब्बल तीन हजारांहून अधिक घरट्यांचे मोफत वाटप केले आहे. यातील दोन हजार घरट्यांत चिमण्यांची संसार थाटला असून, या घरट्यांतून चिवचिवाट वाढला आहे. 

निसर्गरम्य वातावरण, वाडे व कौलारू घरांमुळे शहरात चिमण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. वाडे व कौलारू छतांच्या अडगळीत चिमण्यांना घरटी बांधण्याची संधी होती; परंतु शहरीकरणामुळे कौलारू घरे जाऊन त्या जागी सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्याने चिमण्यांना घरटी बांधावयास जागाच राहिली नाही. त्यातच वृक्षतोडीमुळे चिमण्यांची अडचण झाली. त्यामुळे शहरी भागातील चिमण्यांचा चिवचिवाट बंद झाला होता. या चिमण्यांचे संवर्धन व्हावे, निसर्ग साखळीतील एक घटक असलेल्या चिमण्यांचे अस्तित्व टिकावे, यासाठी रवींद्र शंकरराव शिंदे यांनी सामाजिक जाणिवेतून मोफत घरटी वाटप करण्याचा निर्धार केला. गेल्या तीन वर्षांत त्यांनी तब्बल तीन हजार घरटी मोफत वाटली. 

आजही ते हा उपक्रम तेवढ्याच कल्पकता व तळमळतेने राबवत असून, त्यांच्या या उपक्रमास सकाळ माध्यम समूहाने हातभार लावला आहे. सकाळच्या आवाहनानंतर काही कंपनी, संस्था व व्यक्तींनी पुढे येऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. सकाळच्या तनिष्का गटांच्या माध्यमातून शिंदे यांनी मोफत घरट्यांचे वाटप केले. त्यामुळे सातारा शहरासह उपनगरांतही आता चिवचिवाट ऐकू येऊ लागला आहे. सध्या सामाजिक संस्था, ग्रामपंचायती, महिला बचत गट, देवस्थान ट्रस्ट यांनी मागणी केल्यास ते मोफत घरटी देतात; पण वैयक्तिक घरी लावण्यासाठी चिमणीचे घरटे हवे असेल, तर मात्र त्यासाठी ते घरटे तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे पैसे घेतात. गेली तीन वर्षे ते सातत्याने चिमणी संवर्धनासाठी झटत असून, आतापर्यंत त्यांनी पदरचे अडीच लाख रुपये खर्च करून त्यांनी मोफत घरटी वाटली आहेत. एखाद्या संस्थेने त्यांना घरटे बनविण्यासाठी लागणारे प्लायवुड, फेविकॉल व इतर साहित्य सामाजिक भावनेतून दिला, तर ते मोफत घरटे उपलब्ध करत आहेत. 

घरट्यासाठी संपर्क करा 
रवींद्र शिंदे यांनी तयार केलेल्या घरट्यांचा नागरिकांनी योग्य वापर करावा, एवढीच अपेक्षा आहे. चिमणीच्या घरट्यासाठी इच्छुक नागरिकांनी शिंदे : 94224 04799 यांच्याशी संपर्क साधावा, तसेच सायंकाळी सात ते नऊ या वेळात रवींद्र शिंदे, 92 ए, शुक्रवार पेठ, सातारा येथे संपर्क साधावा. 

सकाळ माध्यम समूह व तनिष्का गटांची साथ 
पक्षीमित्र रवींद्र शिंदे यांनी चिमण्यांसाठी मोफत कृत्रिम घरटे तयार करून जणू "या चिमण्यांनो, परत फिरा रे' अशी आर्त हाक दिली. या हाकेला सकाळ माध्यम समूह व तनिष्का गटांची साथ मिळाली. तनिष्का गटांनी तर चिमणी संवर्धनासाठी मोफत चिमणीची घरटी वाटपाचा उपक्रम राबविला. त्यामुळे दुर्मिळ झालेल्या चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा एकदा शहर व परिसरात ऐकू येऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com