गणेशोत्सवासाठी दिव्यांच्या माळांनी बाजारपेठ प्रकाशमान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

गणेशोत्सवासाठी बाजारपेठ सजावटींच्या लुकलुकणाऱ्या विद्युत दिव्यांनी भरून गेली आहे.

सातारा ः गणरायाच्या मखरासह परिसरही प्रकाशमान व्हावा, वातावरण उल्हासित राहावे, यासाठी या वर्षी लुकलुकणाऱ्या विद्युत दिव्यांच्या माळांच्या विविधतेत भर पडली असून, फुलांत, फळांत आणि आकर्षक आकारांतील प्रकाशमान दिवे नागरिकांना भुरळ घालत आहेत. दरम्यान, आज हरतालिका खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढली होती. 

गणरायाची सजावट चांगली व्हावी, यासाठी दर वर्षी कलाकार काहीतरी नवीन पेश करत नागरिकांना आकर्षित करतात. विविध प्रकारच्या चकचकीत विद्युत दिव्यांच्या माळामध्ये यावर्षी बाजारपेठेत दुकाने "चायना मॉडेल'ने भरून गेली आहेत. टायमिंगवर लुकलुकणाऱ्या माळा, विद्युत दिव्यांनी मढवलेली मखरे, विजेवरची समई, उदबत्त्या असे सारे काही बाजारपेठेत उपलब्ध झाले असून, नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. तीन ते पाच फूट लांबीच्या जंबो विद्युत माळा, विविध रंगांतील चमकीच्या, तसेच स्टार व फोल्डिंग प्रकारातील माळांना अधिक मागणी आहे. त्याचबरोबर झेंडू, जास्वंद, लिली, दुर्वा इत्यादी प्रकारच्या फुलांच्या माळांना मागणी आहे, तसेच विविध प्रकारचे प्रकाशझोत टाकणारे फोकस बल्ब 150 ते 300 रुपयांपर्यंत विक्रेत्यांनी उपलब्ध केले आहेत. 

सजावटीच्या इतर साहित्यात रेशीम, मोती, जिलेटिन पेपर, रंगीबेरंगी कागद, मेटल पेपरचे हार आणि सजावट साहित्याला ग्राहकांची नेहमीच पसंती असते. या वस्तूंची आवक कोलकता, मुंबई येथून होते. प्लॅस्टिक आणि चिनी मातीच्या छोट्या आकर्षक सुरईच्या आकाराचे टेबल पॉट सध्या शहरात जागोजागी विक्रीस ठेवलेले आढळतात. त्याबरोबरच प्लॅस्टिकची आकर्षक फुलेही विक्रीस आहेत. फुलांसह साधारण 100 रुपयास ती विकली जात आहेत. प्रकाशमान होणारे लोलक, कागदी चकचकीत झुरमुळ्या, विद्युत दिवे लावलेल्या प्रभावळी, चक्रे अशा साहित्यालाही मोठी मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 

हरतालिकाही विक्रीस 

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने आज बाजारपेठेत राजवाडा परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील पथावर नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. सोमवारी गणेश आगमनापूर्वी शनिवारी हरतालिका पूजन असल्यामुळे आज बाजारपेठेत महिलांची जास्त गर्दी होती. पूजनाच्या हरतालिकाही आज मोठ्या प्रमाणावर विक्रीस आल्या होत्या. त्यांच्या किमती साधारण 40 ते 50 रुपये होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The market for lamps is lit by Ganeshotsav