बेळगावातील मंगलकार्यालये होणार सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

शहरात 140 हून अधिक नोंदणीकृत मंगल कार्यालये आहेत. त्यांची दरवर्षीची उलाढालही मोठी असते.

बेळगाव : लॉकडाऊनमुळे बंद असलेली मंगल कार्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे यापुढे कार्यालयात लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव-वर वधू व मंगल कार्यालयाच्या संचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. सुमारे सहा महिन्यानंतर आता मंगल कार्यालये खुली होणार आहेत. अनलॉक 5.0 प्रोटोकॉलनुसार मंगल कार्यालयांत विवाहसोहळा आणि वाड:निश्‍चय यासारखे शुभकार्य करण्यास आता परवानगी देण्यात आली आहे. 

कोरोनामुळे 24 मार्चपासून शहरातील मंगल कार्यालये बंद होती. ऐन लग्न सराईत मंगल कार्यालयाला कुलूप अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. मात्र, आता 200 लोकांच्या सहभागासह व नियमांचे पालन करून मंगल कार्यालयांत विवाह करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि सॅनिटायझर वापरणे या किमान मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे आवश्‍यक आहे. कोरोनामुळे मंगल कार्यालये बंद असल्यामुळे फोटोग्राफर्स, केटरर्स, फुलविक्रेते, मंडप डेकोरेटर्स हे व्यवसायिकही अडचणीत सापडले आहेत. 

बेळगावात खानापूर रोडवरील मराठा मंदिर, महात्मा गांधी भवन-कॉलेज रोड, गोवावेस येथील महावीर भवन, पीबी रोडवरील साई भवन, मंडोळी रोडवरील मनोरमा मंगल कार्यालय, सारस्वत भवन शहापूर, होसूर येथील मराठा मंगल कार्यालय, शगुन गार्डन, आशिर्वाद मंगल कार्यालय, मिलेनियम गार्डन, देवांग मंगल कार्यालय, समादेवी मंगल कार्यालय, जालगार मारुती मंदिर चव्हाट गल्ली आदी मंगल कार्यालये आहेत. ही कार्यालये आता सुरु होणार आहेत. अनेक जण मंगल कार्यालयात विवाह करतात. शहरात 140 हून अधिक नोंदणीकृत मंगल कार्यालये आहेत. त्यांची दरवर्षीची उलाढालही मोठी असते. प्रत्येक कार्यालयात दरवर्षी सरासरी 30 ते 35 विवाह पार पडतात. मात्र, कोरोनामुळे ऐन हंगामात विवाह समारंभ झाले नसल्याने मंगल कार्यालये आर्थिक गणित कोलमडले होते. यापूर्वी केवळ 50 जणांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिली होती. मात्र, ही मर्यादा आता हटविण्यात आली आहे. 200 जणांच्या उपस्थितीत सूचनांचे पालन करून विवाह करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

हे पण वाचाइचलकरंजीतील नाझियाच्या बिर्याणीला नाही तोडच ; कष्टाच्या घामाने आणली चव

  
सुमारे सहा महिने मंगल कार्यालये बंदच होती. अनेकांनी बुकींग केले होते, त्यांचे पैसे परत दिले आहेत. आता लग्नासाठी पुन्हा बुकींग होणार आहे. कोरोनामुळे दक्षता घेऊन मंगल कार्यालये सुरु करण्यात येतील. 
-नेताजी जाधव, अध्यक्ष, मंगल कार्यालय कृती समिती 

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage hall will be started in Belgaum