आरेवाडीत विवाहितेची आत्महत्या; पती, सासूवर गुन्हा दाखल

दीपक सूर्यवंशी
Wednesday, 7 October 2020

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अश्विनी मारुती बाबर (वय 22) या नवविवाहितेने आत्महत्या केली. मात्र, सासरच्यांकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले गेले आहे, असा आरोप मुलीच्या माहेरच्यांनी केला.

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अश्विनी मारुती बाबर (वय 22) या नवविवाहितेने आत्महत्या केली. मात्र, सासरच्यांकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले गेले आहे, असा आरोप मुलीच्या माहेरच्यांनी केला. वडिलांच्या तक्रारीवरून कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पती व सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती मारुती साहेबराव बाबर व सासू दया साहेबराव बाबर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी ः आरेवाडी येथील मारुती साहेबराव बाबर व अश्विनी यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला. अश्विनीचे माहेर दुधेभावी येथील आहे. अश्विनीने आरेवाडी येथील राहत्या घरी आज सकाळी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या झाल्याची माहिती आरेवाडीचे सरपंच आबासाहेब साबळे यांनी पोलिसांत दिली होती. 

ही घटना दुधेभावी अश्‍विनीच्या माहेरी समजता, तिचे वडील काकासाहेब राजाराम जाधव हे काही लोकांना बरोबर घेऊन पोलिस ठाण्यात आले. ""माझ्या मुलीला माहेरहून पाच ते दहा तोळे सोने घेऊन ये, असा तगादा लावून शारीरीक व मानसिक छळ केला आहे. त्यामुळेच अश्विनीने आत्महत्या केली. पती व सासूवर गुन्हा दाखल करा व त्यांना अटक करा,'' अशी मागणी वडिलांनी केली.

जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका माहेरच्या लोकांनी घेतल्याने पोलिसांनी पती मारुती व सासू दया यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. 

विभागिय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली. निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड अधिक तपास करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman suicide in Arewadi; Husband, mother-in-law arrested