हुतात्मा स्मृतिस्तंभाचे होणार सन्मानपूर्वक स्थलांतर; क्रातिसिंहांचा पुतळाही बंदिस्त करण्याची सूचना 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

पंचायत समिती आवारातील हुतात्मा स्मृतिस्तंभ सन्मानपूर्वक स्थलांतरित करण्याचा निर्णय आज पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

इस्लामपूर (जि. सांगली) : पंचायत समिती आवारातील हुतात्मा स्मृतिस्तंभ सन्मानपूर्वक स्थलांतरित करण्याचा निर्णय आज पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रांताधिकारी नागेश पाटील अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपसभापती नेताजी पाटील, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्‍य कुंभार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारसदार उपस्थित होते. 

पंचायत समिती आवारात खूप वर्षांपासून असलेल्या हुतात्मा स्मृतीस्तंभाची अवस्था खराब बनली असून, ती धोकादायक ठरू शकते यासाठी पंचायत समितीच्या पुढाकाराने आज बैठक झाली. नवी इमारत बांधत असताना नव्या स्मृतीस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे, मात्र अद्याप त्याचे लोकार्पण झाले नाही शिवाय जुना स्तंभ तशाच अवस्थेत होता. त्यामुळे हा स्तंभ सन्मानपूर्वक हलवण्यात यावा, यावर या बैठकीत चर्चा झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसरातील खोकी बाजूला करावीत तसेच पुतळा कायमस्वरूपी बंदिस्त करावा, अशा सूचना यावेळी झाल्या. बैठकीला भगवानराव तुळसनकर, नितीन बारवडे, नायब तहसीलदार सौ. भांबुरे, बांधकाम अभियंता सुनिल उरुणकर, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ नार्वेकर, श्रीकांत बारटक्के, सज्जन पाटील, नजरुद्दीन नायकवडी उपस्थित होते. 

स्टॅच्यु पार्क होणार! 
पंचायत समितीची नवी इमारत बांधत असतानाच या ठिकाणी स्टॅच्यु पार्क करण्याचे नियोजन केले होते. मात्र गेली अनेक वर्षे ते रखडले होते. यानिमित्ताने ते पुन्हा चर्चेत आले असून या ठिकाणी पुतळे व गार्डन एकत्रित करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचा ठराव नुकताच एका सभेत मंजूर करण्यात आला आहे. 

अखेर सर्व नावे एकत्र येणार! 
पंचायत समिती आवारात असलेल्या जुन्या हुतात्मा स्तंभावर 25 ते 66 या क्रमांकाने नावे आहेत. पहिल्या 24 नावांचे काय? याबाबत दैनिक 'सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला होता. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन बारवडे यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केला. त्यावर या सर्वांच्या नावाची खात्रीपूर्वक तपासणी करून ती एकत्र करू, असे आश्वासन शशिकांत शिंदे यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martyrs Memorial will be shifted in inlsampur