मायणी तलावात रोहित पक्षी अंडी घालतात?

अंकुश चव्हाण
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कलेढोण - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिले मोठी झाल्यानंतर ते पिलांसह परत जातात, असा उल्लेख इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास (भाग १) या पुस्तकात पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने केल्यामुळे राज्यभरातून मायणीत दाखल होत असलेले पर्यटक मंडळावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की मायणीच्या पूर्वेकडून येणाऱ्या ओढ्यावर ब्रिटिशकालीन तलाव आहे. तलावातील अतिरिक्त झालेल्या सांडव्याच्या पाण्यातून पश्‍चिम वाहिनी छोटी नदी तयार झाली असून, ती मायणीस अर्धवर्तुळाकार वेढा घालते म्हणून तिला ‘चांद नदी’ असे नाव पडले. ही नदी पश्‍चिमेला जावून पाच ते सहा किलोमीटरवर येरळा नदीस मिळते. मायणी तलावात वर्षानुवर्षे रोहित पक्षी येत होते. परंतु, गेल्या पाच ते सहा वर्षांत या तलावात पाणीसाठा न झाल्याने मायणीच्या दक्षिणेस १२ किलोमीटरवर असणाऱ्या येरळवाडी तलावात रोहित हजेरी लावतात. ते सायबेरियातील अतिथंडीपासून बचाव करण्यासाठी सुमारे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येतात. 

तलावातील शेवाळ व कीटक खाऊन वास्तव्य करून उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर ते परतीच्या प्रवासास निघतात. मात्र, इथे घरटी व अंडी 
घालत नाहीत. त्यांचे प्रजनन गुजरातच्या कच्छच्या रणात होते. मायणी किंवा येरळेवाडी तलावात ते घडत नाही. असे असताना इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास (भाग १) या ‘पर्यावरण आणि आपण’ या पाठात पान क्रमांक ९३ वर रोहित पक्ष्यांची चुकीची माहिती देण्यात आली आहे. पुस्तकातील माहितीनुसार,‘महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिले मोठी झाल्यावर ते पिलांसह परत जातात’ याचबरोबर पुस्तकात ‘रोहित पक्षी व त्यांची घरटी’ याचे चित्र प्रसिद्ध झाल्यामुळे पर्यटकांची दिशाभूल होत आहे. याबाबत पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने या माहितीची दुरुस्ती करावी, अशी मागणी मायणीतील पक्षीमित्र व पर्यावरणमित्र संघटनांनी केली आहे.

पुस्तकातील माहितीने राज्यभरातील पक्षीप्रेमी तलाव परिसरात येतात. मात्र, सध्या तलावात पाणीसाठा नसल्याने नाराज होवून परतात. भविष्यात तलावात पाणीसाठा झाल्यास पक्षी दाखलही होतील. मात्र, चुकीच्या माहितीमुळे सध्या पक्षीप्रेमी व पर्यटकांची दिशाभूल होत आहे. याबाबत पाठ्यपुस्तक मंडळाकडे आपण तक्रार देणार आहोत.
-प्रा. डॉ. श्‍यामसुंदर मिरजकर, पक्षीप्रेमी, मायणी

Web Title: Mayani Lake Rohit Bird Egg