esakal | 'डावं दाखवून, उजवं हाणलं', जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

mayor of sangli municipal corporation jayant patil and politics in sangli

वास्तविक सांगलीच्या निवडणुकीत जयंत पाटील व चंद्रकांतदादा पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

'डावं दाखवून, उजवं हाणलं', जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर (सांगली) : सांगली - मिरज - कुपवाड महानगर पालिकेच्या सत्तेत बहुमत नसतानाही राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी आणि उमेश पाटील यांची महापौर व उपमहापौर पदी निवड झाल्याने वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. जयंत पाटील यांनी 'डावं दाखवून, उजवं हाणत' भाजपचा सांगलीत करेक्ट कार्यक्रम केल्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला .

या निवडीमुळे जयंत पाटील यांच्या मुरब्बी राजकारणाचा पैलू पुन्हा एकदा आज अधोरेखित झाला. जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीच्या महापौर निवडीवर प्रतिक्रिया देताना आम्हाला जनतेने नाकारलेली सत्ता नको आहे, असे म्हणत भाजपला गाफील ठेवले होते. त्या दिवसापासून किंवा त्याच्या आगोदर पासूनच त्यांनी भाजपाचा कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग लावली होती. कोणत्याही गोष्टीत योग्य वेळ आली की, मी कार्यक्रम करतोच, त्या साठी आदळ आपट न  करता, लढाई आपल्या हिशोबाने करायची असते हे त्यांनी अखरे करून दाखवले. 

हेही वाचा - भाजपमध्ये मोठी फूट ; सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी

वास्तविक सांगलीच्या निवडणुकीत जयंत पाटील व चंद्रकांतदादा पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महापौर निवडीसाठी वाळवा तालुक्यातील भाजपा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगलीत दाखल झाले होते. मात्र जयंत पाटील यांनी अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम आखल्याने कोणाच्याही ताकास तुरर लागला नाही आणि दिग्विजय सूर्यवंशी महापौर झाले. सांगलीत निवड घोषित होताच, इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी झाली. या निवाडीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले. अगदी काही महिन्यावर इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे सांगलीतील महापौर निवडणुकीत बाजी मारून राष्ट्रवादीने इस्लामपूर नगरपालिकेतील झलक दाखवली असे म्हटंल्यास वावगे ठरणार नाही.

संपादन - स्नेहल कदम