महापौरपद खुले; इच्छुकांची संख्याही वाढली; भाजपसमोर आव्हान

बलराज पवार
Thursday, 14 January 2021

महापालिकेतील महापौर पदाची दुसरी अडीच वर्षाची टर्म पुढील महिन्यात सुरु होईल. यावेळी पद खुले असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. राज्यातील सत्तातरांमुळे महापालिकेतही बदलाचे वारे येईल या आशेवर विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांना महापौरपदाची स्वप्ने पडत आहेत.

सांगली : महापालिकेतील महापौर पदाची दुसरी अडीच वर्षाची टर्म पुढील महिन्यात सुरु होईल. यावेळी पद खुले असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. राज्यातील सत्तातरांमुळे महापालिकेतही बदलाचे वारे येईल या आशेवर विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांना महापौरपदाची स्वप्ने पडत आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढतेय. महिनाभर आधीच महापालिकेत हालचाली गतीमान झाल्या आहेत. 

स्थायी समितीच्या सभापती निवडीवेळी सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभापती-महापौर ब्रॅन्डेड भाजपचेच असतील, असा दावा केला होता. त्यावेळीच पुन्हा एकदा महापालिकेत महाआघाडीच्या प्रयोगाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीच महापालिकेत रस नसल्याचे जाहीर करून त्या चर्चेवर पडदा टाकला. स्थायीच्या निवडीवेळी कॉंग्रेसकडून पाय मागे ओढला नसता सत्तांतर झाले असते अशी अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महापौर निवडीवेळी कॉंग्रेसला वगळून गणित जमतं का याबद्दलही राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चा आहे. 

भाजपमध्ये भाऊगर्दी 
धीरज सुर्यवंशी, युवराज बावडेकर, निरंजन आवटी, अजिंक्‍य पाटील, स्वाती शिंदे यांच्या महापौरपदासाठी पडद्याआड हालचाली सुरु आहेत. अंतिम निर्णय भाजपची कोअर कमिटी घेणार असल्याने साऱ्यांचेच मौन आहे. शिंदे वगळता अन्य सर्वांनी भाजप सत्तेत महत्वाची पदे भुषवली आहेत. आवटी यांचे बंधू संदीप यांना स्थायीच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे. धीरज सूर्यवंशी यांनी आमदार गाडगीळ यांच्यासह राज्यस्तरावर संपर्क वाढवला आहे. आपल्याला पद मिळालं तर जयंत पाटील थोडं सबुरीने घेतील असं ते पालिका वर्तुळात बिंबवताना दिसतात. 

धाकधूक का ? 
विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील नगरसेवकांची मंत्री जयंतरावांवर भिस्त आहे. ते "करेक्‍ट कार्यक्रम' करतील अशी त्यांना आशा आहे. मंत्री पाटील सतत भाजपला जनतेने पाच वर्षांसाठी संधी दिल्याचे सांगत आहेत. त्यामुळेच शंकेची पाल चुकचुकत आहे. अलिकडे पुणे पदवीधर निवडणुकीवेळी भाजपचे काही नगरसेवक जयंतरावांना भेटल्याची चर्चा आहे. स्थायी सभापती निवडीवेळीच कॉंग्रेसचे मंगेश चव्हाण यांनी भाजपचे दोन सदस्य गळाला लावल्याची चर्चा सुरू केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वपक्षीयांना जाहीर कानपिचक्‍या देताना बहुमत असताना धाकधूक का असा सवाल केला होता. 

सध्याचे बलाबल 
भाजप : 43 (दोन सहयोगी अपक्षांससह) 
कॉंग्रेस : 19 
राष्ट्रवादी : 15 
रिक्त जागा : 1 
एकूण जागा: 78 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayoral post open; The number of aspirants also increased