सांगोल्यात निकालानंतरही 'मीडिया वॉर'

दत्तात्रय खंडागळे
Friday, 25 October 2019

सांगोला तालुक्यावर अर्धशतकीय सत्ता असलेल्या शेकापचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निसटत्या फरकाने विजयी झाले.

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला तालुक्यावर अर्धशतकीय सत्ता असलेल्या शेकापचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निसटत्या फरकाने विजयी झाले. विजयानंतर सांगोल्यात सोशल मीडियावर 'मी नाही, आपण जिंकलो' ही शहाजीबापूंची तर 'अभी तो शुरवात है, और भी लढेंगे" ही डॉ. अनिकेत देशमुख यांचा फोटो टाकून पोस्ट व्हायरल झाल्या. निकालानंतरही सांगोल्यात सोशल मीडियावर अद्यापही निवडणुकीचे रणांगण आहे.

विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. पक्षाच्या उमेदवार निवडीपासून निकालापर्यंत निवडणुकीत वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. सुरवातीला शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या वारसदारावर राज्यभर चर्चा झाली. आमदार देशमुख यांचे वारसदार व शेकापचे उमेदवार म्हणून प्रथमतः भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित झाले होते, परंतु अचानकपणे डॉ. अनिकेत देशमुख यांना शेकापची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाऊसाहेब रुपनर साहेब यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला. महायुतीच्या उमेदवारी बाबतीतही भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. परंतु महायुतीकडून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली.

भाजपकडून इच्छुक असलेल्या राज्यश्री नागणे यांनी थेट बंड करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनाही पक्षाने एबी फॉर्म देऊनी पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी राष्ट्रवादीचा पाठिंबा शेकापला दिला. यामुळे दीपक साळुंखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन महायुतीचे शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा देत महायुतीच्या तंबुत दाखल झाले. यामुळे महायुतीकडे भाऊसाहेब रुपनर, दीपक साळुंखे-पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, चेतनसिंह केदार, पाणी संघर्ष चळवळीचे प्रफुल्ल कदम, आनंदा माने, संजय देशमुख, अतुल पवार, दत्ता टापरे असे अनेक नेतेमंडळी शहाजीबापूंच्या विजयासाठी निकराचे प्रयत्न करताना दिसले.  

निवडणुकीचा निकालादिवशी महायुतीतील एकाने बापूंचा विजय झाल्यानंतर शुभेच्छा देत बापू तुम्ही जिंकलात अशी म्हणून मिठी मारली. यावेळी शहाजीबापूंनी 'मी नाही आपण जिंकलो' असे बोलले आणि ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र प्रसारीत झाली. महायुतीकडे अनेक दिग्गज नेते मंडळी असल्याने शहाजीबापूंंनी आपल्या राजकीय कौशल्याने मी एकटा आमदार झालो नसून आपल्या विचाराचे येथे असणारे सर्वच आमदार झाले आहेत असे सर्व नेतेमंडळींना उद्देशून बोलले.

कार्यकर्त्यांमध्ये याची दिवसभर चर्चा होती. शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांचा पराभवही अल्पशा मतात झाला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी 'अभी तो शुरुवात है, हम और जरूर लढेंगे' अशा पोस्ट व्हायरल केल्या होत्या. निवडणूक निकालानंतरही सांगोल्याची निवडणूक अद्यापही चांगलीच गाजत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Media War in Sangola after Election Results