esakal | कोरोनाच्या संकटातच वैद्यकीय कचरा रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Medical waste on the streets of Corona crisis belgaum

बेळगाव शहरातील वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने वैद्यकीय कचऱ्याची समस्या पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

कोरोनाच्या संकटातच वैद्यकीय कचरा रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव ः बेळगाव शहरातील वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने वैद्यकीय कचऱ्याची समस्या पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. सोमवारी रात्री येथील नगरगुंदकर भावे चौकात वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळून आले. मोकाट जनावरांकडून तो कचरा खात जात असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. 

कोरोनामुळे बेळगाव शहर लॉकडाऊन आहे, तर कॅंप परिसरात कोरोनाचा रूग्ण आढळल्याने कॅंप परिसर सील डाऊन करण्यात आला आहे. या परिस्थितीत महापालिका व कॅन्टोनमेंट बोर्डाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पण शहराच्या मध्यवर्ती भागात वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने आता महापालिका प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शहरातील वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खासबाग येथे महापालिकेच्या मालकीच्या जागेत 2000 मध्ये स्वतंत्र प्रकल्प करण्यात आला आहे. हा प्रकल्प वैद्यकीय संस्थेकडून चालविला जातो. शहरातील सर्व रुग्णालय व प्रसूतीगृहांधील वैद्यकीय कचरा एकत्र करून त्या प्रकल्पाद्वारे त्याच्यावर शास्त्रीय पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली जाते. 20 वर्षांपूर्वी कर्नाटकातील हा पहिला प्रकल्प राबविल्याने त्यावेळी बेळगाव महापालिकेला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 

कोरोना विषाणूचा फैलाव होत असतानाच वैद्यकीय कचऱ्याबाबत महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला हवी. मात्र काही रुग्णालयांकडून वैद्यकीय कचरा थेट चौकात टाकला जात आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक रुग्णालये बंद आहेत, त्यामुळे हा कचरा कमी आहे, त्यामुळे जमा झालेला कचरा प्रकल्पात घेऊन जाणे गरजेचे होते, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 

यामुळे या प्रकरणी कर्नाटक ऍनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी मोकाट जनावरांच्या मालकांना इशारा दिला आहे. वैद्यकीय कचरा खाणारी ती जनावरे खासगी मालकीची आहे. त्या जनावरांना मोकाट सोडले जावू नये अन्यथा त्याना थेट गोशाळेत पाठविले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनीही कारवाई करावी अशी मागणी त्यानी केली आहे. 

शोध घेऊन तातडीने कारवाई

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत कोणी रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकत असेल तर त्यांचा शोध घेऊन तातडीने कारवाई केली जाईल. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट खासबाग येथील प्रकल्पातच झाली पाहिजे. त्यासाठी सर्व दवाखाने व प्रसूतीगृहाना सूचना दिल्या जातील. 

- डॉ. संजय डूमगोळ. आरोग्याधिकारी-


 

loading image