रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट ठरली केवळ एक औपचारिकता; ना निवेदन, ना चर्चा, ना आश्वासन

प्रमोद जेरे
Saturday, 19 December 2020

प्रचंड लवाजम्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची मिरज स्थानकास आज (शुक्रवारी) दिलेली भेट म्हणजे निव्वळ एक औपचारिकता ठरली.

मिरज (जि. सांगली) : प्रचंड लवाजम्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची मिरज स्थानकास आज (शुक्रवारी) दिलेली भेट म्हणजे निव्वळ एक औपचारिकता ठरली. कुर्डूवाडी ते मिरज या मार्गाची पाहणी करण्यासाठी ते तेरा डब्यांच्या विशेष गाडीने मिरजेला आले; पण मिरज रेल्वे स्थानकावर ते गाडीतून खालीदेखील उतरले नाहीत.

त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकावरील काही खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्थानकासमोरील मॉलचे अपूर्ण बांधकाम आणि अन्य बाबींची पाहणी केली. अवघ्या काही मिनिटांत महाव्यवस्थापक मित्तल आणि त्यांचा लवाजमा कुर्डूवाडीकडे रवाना झाला. मिरजेला त्यांचे येणे औपचारिक असल्याचे कारण सांगत मध्य रेल्वे प्रशासनाने मित्तल यांच्या भेटीपासून व्यापारी प्रवासी संघटनांसह सर्व लोकप्रतिनिधींनाही दूर ठेवले. 

कुर्डूवाडी ते मिरज हा मार्ग आणि या मार्गावरील काही स्थानकांची पाहणी करण्यासाठी महाव्यवस्थापक मित्तल हे आज तेरा डब्यांच्या विशेष गाडीने मिरजेला आले. त्यांच्या भेटीसाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाची जय्यत तयारी सुरू होती. त्यांची आजची भेटही कुर्डूवाडी ते मिरज पुरतीच मर्यादित असल्याने मिरज स्थानकावर त्यांना भेटण्यासाठीची कोणतीही वेळ सोलापूर विभागाने निश्‍चित केली नाही.

त्यामुळे त्यांच्या भेटीविषयी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मिरज परिसरातील कोणाही लोकप्रतिनिधी, प्रवासी, व्यापारी संघटनांना याची माहितीही दिली नाही. साहजिकच आजच्या महाव्यवस्थापकांच्या मिरज भेटीवेळी कोणीही लोकप्रतिनिधी अथवा व्यापारी प्रवासी उद्योजक कामगार संघटनांचे प्रतिनिधी भेटावयास मिरज रेल्वे स्थानकावर आले नाहीत. त्यामुळे आजचा महाव्यवस्थापक मित्तल यांचा कुर्डूवाडी मिरज दौरा म्हणजे निव्वळ एक औपचारिकता ठरला. 

ते आले... इंजिन फिरवले... परत गेले! 
आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजता महाव्यवस्थापक मित्तल हे कुर्डूवाडीहून मिरजेकडे त्यांच्या तेरा डब्यांच्या विशेष गाडीने निघाले. या प्रवासादरम्यान मोडनिंब, सांगोला, जतरोड कवठेमहांकाळ, सलगरे या स्थानकांच्या पाहणीचे नियोजन होते. सकाळी 9.05 वाजता ते मिरज स्थानकात आले. मिरजेहून कुर्डूवाडीकडे जाण्यासाठी त्यांच्या विशेष गाडीचे इंजिन फिरवून घेण्यात आल्यानंतर लगेच ते परत कुर्डुवाडीकडे रवाना झाले. या दरम्यान, केवळ 15 ते 20 मिनिटांच्या कालावधीत मित्तल यांच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मिरज स्थानकाची पाहणी करण्याच्या औपचारिकता पूर्ण केल्या. 

संपादन : यवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The meeting of the General Manager of Railways was just a formality; No statement, no discussion, no assurance