Vidhan Sabha 2019 सातारा जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या धडाडणार तोफा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून, आता प्रत्येक पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहेत.

सातारा : लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून, आता प्रत्येक पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस, भाजप-शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याही सभा होणार आहेत. त्यामुळे आगामी आठ दिवस जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. 

राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विरोधकांच्या सभा होतील, तेथेच सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सर्वाधिक सभा जिल्ह्यात होणार आहेत. यामध्ये सातारा, वाई, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, पाटण आणि फलटणचा समावेश आहे. तसेच भाजप व शिवसेनेच्या नेत्यांच्या ज्या ठिकाणी सभा होतील, त्या ठिकाणी शरद पवारांच्या सभा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार नियोजन आहे. तसेच 19 ऑक्‍टोबरला कोरेगावात सांगता सभाही होणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
भारतीय जनता पक्षाने सातारा लोकसभा व विधानसभा तसेच कऱ्हाड दक्षिण, फलटण, माण तालुक्‍यांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार सातारा व कऱ्हाडात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होणार आहेत. तसेच उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माण आणि फलटणला सभा होणार आहेत. पहिली सभा दुपारी तीन वाजता जयकुमार गोरेंच्या प्रचारार्थ म्हसवडला, तर दुसरी सभा दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी पाच वाजता फलटणला होणार आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या चार सभा जिल्ह्यात होतील. यामध्ये सातारा, कऱ्हाड दक्षिण, माण आणि वाईला प्राधान्य असेल. 

शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा जिल्ह्यात होणार आहेत. यामध्ये 12 तारखेला आदित्य ठाकरे यांच्या माण, पाटण, कऱ्हाड उत्तर आणि कोरेगाव येथे एकाच दिवशी चार सभांचे नियोजन आहे. तसेच 15 किंवा 16 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा होतील. यामध्ये माणला प्राधान्य दिले आहे. या सभांच्या माध्यमातून माण आणि कऱ्हाड उत्तरेत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावली जाणार आहे. तसेच उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्याही जिल्ह्यात सभा होणार असून, ते आगामी आठ दिवसांत विदर्भ-मराठवाड्याच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा जाणार आहेत.

आतापर्यंत त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सभा घेतल्या आहेत. यासोबतच शिवसेनेने मंत्र्यांसोबतच एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, लक्ष्मणराव वडले यांच्याही सभांचे नियोजन केले आहे. 

साताऱ्यात प्रियांका गांधी येणार? 

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या वतीने जिल्ह्यात प्रियांका गांधी यांची एक सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. ही सभा नेमकी कुठे घ्यायची, साताऱ्यात की कऱ्हाडात, याचे नियोजन सुरू आहे. अद्याप त्यांच्या दौऱ्याची निश्‍चिती झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meetings of prominent leaders will be held in satara