esakal | "अतिक्रमण हटाव'ला विरोध; व्यापारी आयुक्तांना भेटणार; वेठीस धरल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

merchants  Opposed to  "Encroachment Removal"; will Meet Commissioner

गेल्या सहा दिवसांपासून अचानकपणे सुरू झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला आज बालाजी चौक, जुनी मंडई परिसरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला.

"अतिक्रमण हटाव'ला विरोध; व्यापारी आयुक्तांना भेटणार; वेठीस धरल्याचा आरोप

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : गेल्या सहा दिवसांपासून अचानकपणे सुरू झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला आज बालाजी चौक, जुनी मंडई परिसरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला. कोरोनाने आधीच व्यापार ठप्प झाला असताना ऐन सणासुदीच्या काळात दुकानासमोर तोडफोड करून महापालिका यंत्रणा वेठीस धरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. माजी नगरसेवक शेखर माने यांची अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी दिलीप घोरपडे यांच्याशी बाचाबाची झाली. उद्या (ता. 6) व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ आयुक्त व उपायुक्तांना भेटणार आहे. 

मुख्य बाजारपेठांतील पदपथ मोकळे करणे, वाढीव शेड, छपऱ्यांची अतिक्रमणे हटवणे, अवैध बांधीव कट्टे तोडून टाकणे असे कारवाईचे स्वरुप आहे. नवे उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे यांनी जेसीबीसह कर्मचाऱ्यांचा लवाजमा घेत मोहीम सुरू केली आहे. आजही पथकाने गणपती पेठ, बालाजी चौक, हरभट रोड, जुनी मंडई तसेच बुरुड गल्लीतील 100 हून अधिक अतिक्रमण हटवली. मुख्य मार्गावरील व्यावसायिकांची बेकायदा थाटलेली पत्र्याची शेड जेसीबीने काढली. रस्त्यावर बांधलेले कट्टे, पायऱ्यासुद्धा हटवल्या. 

दुपारी बाराच्या सुमारास व्यापाऱ्यांनी कारवाईला बालाजी चौक परिसरात विरोध केला. शिवसेना नेते शेखर माने यांनीही विरोध केला. व्यापारी एकत्र आले. कोरोना काळात व्यापार ठप्प आहे. माणसांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. अशा काळात वेठीस धरण्याची दुर्बुध्दी कशी सुचली? असा सवाल श्री. माने यांनी केला. 

टाळेबंदी सुरू झाल्यानंतर अशा कारवाया तूर्त थांबवा असे स्पष्ट उच्च न्यायालयाने आदेश दिलेत. त्याकडे माने यांनी लक्ष वेधले. घोरपडेंनी अतिक्रमणे हटवत नाही. रस्त्यावरील अडथळे हटवत आहोत, असे स्पष्ट केले. नागरिकांच्या सोयीसाठी कारवाई सुरु आहे, असे सांगितले. 

व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी ही मोहिम आहे का ? असा सवाल केला. 
आयुक्त-उपायुक्तांचे आदेश आहेत. तुम्ही त्यांच्याशीच बोला, असे श्री. घोरपडे यांनी सांगितले. त्यानंतर कारवाई थांबवण्यात आली. उद्या शिष्टमंडळ आयुक्तांना भेटेल. 

संपादन : युवराज यादव