
सांगली : वंचित भागाला ‘म्हैसाळ’चे पाणी
आरग - मिरज पूर्व भागातील आरग, लक्ष्मीवाडी, बेडग, नरवाड या गावांतील पाण्यापासून वंचित असणाऱ्या उंच टेकडीवरील ११०० हेक्टर क्षेत्राला नलिका वितरण प्रणालीद्वारे कायमस्वरुपी पाणी देण्याची योजना पाटबंधारे विभागाने आखली आहे. यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव मान्य करून लवकर काम सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. येथील गावांना जोडणारा हा भाग पठार या नावाने ओळखला जातो. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यावरील हा भाग उंचीवर आहे. उंच पातळीवरील अंदाजे ११०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या क्षेत्राला पाणी देण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी म्हैसाळ लाभक्षेत्रातील वंचित क्षेत्राला कायमस्वरुपी पाणी मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीला यश आले. बेडग कालव्यावर पंप हाऊस उभारण्यात येणार आहे. आठरशे मीटर लांबीची ऊर्ध्वगामी नलिका आणि वितरण हौदाच्या पुढे नलिका वितरण प्रणालीद्वारे क्षेत्राला पाणी देण्यात येणार आहे. सध्या हा भाग उंचीवर असून कालवा अथवा सायपन पद्धतीने येथे पाणी पोहोचत नाही. नवीन आराखड्यानुसार हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
वंचित क्षेत्र पुढीलप्रमाणे ...
बेडग २६४, आरग ५३१, नारवड १६६, लक्ष्मीवाडी १३९ हेक्टर. हा सर्व म्हैसाळ कालव्यावरील वंचित असणारा भाग ओलिताखाली येईल आणि ऐन उन्हाळ्यातील पाण्याची समस्या मार्गी लागेल.
Web Title: Mhaisal Water To Deprived Areas Jayant Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..