बार्शीचा ‘म्होरक्या’ दिल्लीत; चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

सुदर्शन हांडे
शनिवार, 14 एप्रिल 2018

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने धन्य झाल्यासारखं वाटतयं. आमच्या मेहनतीला यश मिळाले आहे. आमची सर्व टीम खुश आहे. पुढील काम करण्यासाठी उत्साह वाटला आहे.
-अमर देवकर, दिग्दर्शक

बार्शी : ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या बार्शीच्या अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय कामगगिरी व उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने बार्शीचा झेंडा दिल्लीत फडकला आहे.  

चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर हे मूळचे बार्शी जि. सोलापूर येथील रहिवाशी. त्यांना पुणे विद्यापीठात ललित केंद्रात प्रवेश मिळाला नाही म्हणून मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ६ वर्षात ८२ लघुपट पूर्ण केले. चित्रपटाशी संबंधित सर्व विभागात काम करुन अनुभव घेतल्यानंतर ‘म्होरक्या’ हा चित्रपट करण्याचे ठरविले. त्यासाठी दोन एकर जमीनही विकली. कल्पनाच्या जगात जगण्यापेक्षा आपल्या सभोवताली जे घडते ते पाहणे प्रेक्षकांना आवडते याचा विचार करुन ग्रामीण वास्तव व प्रामाणिकपणावर आधारित व ग्रामीण भागाच्या समस्या मंडण्याण्यासाठी ‘म्होरक्या’ची निर्माती केल्याचे सांगितले.

मानवी संवेदना चित्राच्या माध्यमातून प्रभावी व मनोरंजकपणे मांडणे हे चित्रपटाची ताकद आहे. यामध्ये ग्रामीण भागातील एका १४ वर्षाच्या मुलाची कथा आहे. गावात मेंढ्या राखणारा हा मुलगा शाळेसमोरुन जातो तेव्हा २६ जानेवारीनिमित्त एका मुलाच्या नेतृत्वाखाली २५ मुलांचे संचलन सुरु असते. त्या नेतृत्व करणाऱ्या मुलाच्या चित्रपटातील नायक स्वत:ला आणि मुलांच्या ठिकाणी मेंढ्यांना पाहत जातो. त्यातूनच भारतीय लोकशाहीच्या विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या तत्त्वज्ञानावर भाष्य केले आहे. 

या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत. कल्याण पडळ व युवराज सरवदे हे निर्माते असून अमर देवकर हे सहनिर्माते आहेत. कथा आणि दिग्दर्शन अमर देवकर यांचे असून निलेश रसाळ यांनी संपादन केले आहे. गिरीश जांभळीकर यांची फोटोग्राफी, संगीत आदित्य बेडेकर यांचे आहे तर कार्यकारी निर्माता म्हणून उमेश मालन आणि अभय चव्हाण यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पडली आहे. प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून शुभम गोणेकर यांनी काम पाहिले आहे. 

या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होवून २ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तो रिलीज करताना आर्थिक अडचणी येत आहेत. आम्हाला प्रेझेंटेटर भेटला नाही. आम्ही त्याच्या शोधात आहोत. निर्मात्यांनी विश्वास ठेवल्यामुळे चित्रपट पूर्ण झाला. आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करु असा विश्वास म्होरक्याच्या टीम ने व्यक्त केला आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने धन्य झाल्यासारखं वाटतयं. आमच्या मेहनतीला यश मिळाले आहे. आमची सर्व टीम खुश आहे. पुढील काम करण्यासाठी उत्साह वाटला आहे.
-अमर देवकर, दिग्दर्शक

Web Title: Mhorkya film win National Awards