पैसे मिळवून देणाऱ्या मक्‍यावर लष्करी आळीचा हल्ला

सदाशिव पुकाळे
Monday, 27 July 2020

​झरे  परिसरात हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून मका घेतला जात असे. परंतू अलीकडच्या दोन-तीन वर्षांत मक्‍यावर लष्करी आळी हल्ला करीत असल्याने उत्पादनांत घट झाली.

झरे : परिसरात हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून मका घेतला जात असे. परंतू अलीकडच्या दोन-तीन वर्षांत मक्‍यावर लष्करी आळी हल्ला करीत असल्याने उत्पादनांत घट झाली. त्यामुळे मका उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. केवळ चाऱ्यासाठी शेतकरी मका लागवड करीत आहेत. 

लष्करी आळी मारण्यासाठी अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. रासायनिक किटकनाशकांच्या वेगवेगळ्या तीन चार फवारण्या केल्या तरी लष्करी आळी जात नाही. अनेक शेतकऱ्यांनी लष्करी आळीला वैतागून मका पेरणीकडे दुर्लक्ष केले आहे. 
मक्‍याऐवजी शेतकरी कडधान्य, कांदा पिकाकडे वळलेत. ज्यांच्या घरी जनावरे आहेत, असे शेतकरी जनावरांसाठी चारा म्हणून मका करीत आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांनी मक्‍याकडे पाठ फिरवून अन्य पिकांना पसंती दिली आहे. लष्करी आळी हटवण्यासाठी काहीजण निरमा, चुना व साबणाची फवारणी करीत आहेत. काहींनी संत्रा दारूचाही उपयोग केला. शेती औषध दुकानातील औषधे मका उत्पादकाला परवडत नसल्याने बऱ्याच जणांनी देशी औषधांचा उपाय सुरू केला आहे. 

काही केल्या लष्करी आळी जात नाही. मरतही नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. हमखास पैसे मिळवून देणारे हे एकमेव पीक होते. लष्करी आळीचा हल्ला सुरू झाल्याने पीक कोणते घ्यावे या विचारात शेतकरी आहे. 

देशी दारूचा वापर.. 
काही शेतकऱ्यांनी कपडे धुण्याचा साबण व साबण पावडरची फवारणी केली. काहींनी साबण पावडर व चुना याची फवारणी केली. काहींनी साबण पावडर, चुना व देशी दारूचाही वापर केला आहे. तरीसुद्धा लष्करी आळी हटत नाही हा अनुभव आहे. 

नवे पिक, नवे संकट 
पंधरा-वीस वर्षांपूर्वी परिसरात हमखास पैसे देणारे पीक म्हणजे कापूस घेतला जात असे. बनावटी बियाणांमुळे कापसाचे पीकच परिसरातून गायब झाले. त्यानंतर हमखास पैसे मिळणारे पीक म्हणून शेतकरी मका उत्पादनाकडे वळले. दोन वर्षापासून मक्‍यावरील ही लष्करी आळीचा हल्ला होत असल्याने या पिकाला सुद्धा शेतकरी वैतागू लागला आहे.  

 
संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Military attack on money laundering corn