अडीच हजार हेक्‍टरवर लष्करी अळी ; जिल्ह्यात चाराटंचाई भासणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

तालुकानिहाय अळी बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
सातारा 14.40, कोरेगाव 12.2, खटाव 545, कऱ्हाड 235, पाटण 215, वाई 120, जावळी 1.85, खंडाळा 11, फलटण 562, माण 745. 

काशीळ ः राज्याच्या अनेक भागांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असून, जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्‍याचा अपवाद वगळता इतर सर्व भागांत कमी अधिक स्वरूपात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कृषी विभागाने राबविलेल्या मोहिमेनुसार जिल्ह्यातील 500 गावांतील दोन हजार 461 हेक्‍टर क्षेत्रावर प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे पुढील काळात तीव्र चाराटंचाईला समोरे जावे लागणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. 

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण या तीन तालुक्‍यांत तीव्र दुष्काळ असल्यामुळे शेतीला पूरक म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो. सहाजिकच या तालुक्‍यांत दुभत्या जनावरांची संख्या जास्त आहे. वरील तीन तालुक्‍यांत अनेक गावांत अजूनही पाणीटंचाईमुळे काही क्षेत्र नापेर आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे किंवा पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या मका आणि बाजरी पिके जास्त प्रमाणात केले आहे. मात्र, सध्या मका पिकांस अमेरिकन लष्करी अळीने घेरल्याने शेतकऱ्यांची "दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खरिपाच्या सुरवातीपासून कमी प्रमाणात का होईना मक्‍यावर अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली होती. आता मात्र या अळीने भीषण रूप धारण केले आहे. जिल्ह्यात नुकतीच कृषी विभागाने मोहीम काढून या मका पिकांवरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची पाहणी केली आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील 500 गावांतील दोन हजार 461 हेक्‍टर क्षेत्रावरील मका पिकांस प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी, तसेच कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात असले, तरी कितपत यश येईल सांगता येत नाही. यामुळे चाराटंचाई भीषण होणार आहे. परिणामी दुग्ध उत्पादनात घट होणार आहे.

अजूनही या तीन तालुक्‍यांतील अनेक गावांत पाण्यासाठी टॅंकर, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू आहेत. त्यातच याच तीन तालुक्‍यांत अळी प्रादुर्भाव बाधित क्षेत्र सर्वाधिक आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहे. इतर तालुक्‍यांतही या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये कऱ्हाड, पाटण, वाई या तालुक्‍यांत शंभर हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे. 

या अळीची अधाशीपणे वेडीवाकडी पाने खाणे, कोवळा शेंडा खाणे, पोंग्यात जाऊन पोंगा खाणे, पानांवर भुशाप्रमाणे विष्ठा सोडणे आदी प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तसेच विविध औषधे वाटप केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Military type of insect on two and a half thousand hectares