#MilkAgitation काही शेतकऱ्यांनी दूधाचे केले ठिबक सिंचन तर काहींनी बनवला खवा

राजकुमार शाह 
सोमवार, 16 जुलै 2018

पापरी तालुका मोहोळ येथील काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध ठिबक सिंचन द्वारे फळबागांना देणे सुरू केले आहे तर काहींनी दुधाचा खवा करणे सुरू केले आहे.

मोहोळ - दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या धसक्याने मोहोळ तालुक्यातील सुमारे सुमारे दीड लाख लिटर दूध संकलन ठप्प झाले असून दुधाचे काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर एवढे करूनही पदरात काय पडणार का? याचीही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान पापरी तालुका मोहोळ येथील काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध ठिबक सिंचन द्वारे फळबागांना देणे सुरू केले आहे. तर काहींनी दुधाचा खवा करणे सुरू केले आहे.

दुधाला प्रति लिटर पाच रुपये दर वाढवून द्या व ते थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या आठवड्यापासूनच आंदोलनासंदर्भात वातावरण निर्मिती झाल्याने दूध संकलन केंद्र चालकाने दूध उत्पादकांना दुध आणू नका म्हणून सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सर्वच दूध संकलन केंद्र समोर आज शुकशुकाट दिसत होता.

एवढ्या मोठ्या दुधाचे करायचे काय? या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक महिला शेतकऱ्यांनी अडगळीला पडलेल्या कढया व उलतानी शोधून खवा करण्यास सुरू केली आहे. तर दूधात कॅल्शिअम असल्याने व ते पिकाच्या वाढीला पोषक असल्याने येथील दूध उत्पादक शेतकरी पोपट परमेश्वर भोसले व सुरेश शामराव सावंत यांनी बोर, डाळिंब व वांगी आदी पिकांना ठिबक सिंचनाद्वारे दूध सोडणे सुरू केले आहे तर येथील महिला दूध उत्पादक शेतकरी सिंधुताई भोसले यांनी खवा करण्यास सुरू केले आहे. दरम्यान तालुक्यात दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 

'दूध मुंबईला जाऊ देणार नाही' -
एरवी अगदी किरकोळ कारणावरून हि आंदोलनाचे हत्यार उपसणारे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आंदोलकांनी दुधाची नासाडी करू नये, टँकरचेही नुकसान करू नये व तो टँकर ज्या गावातून आला त्याच गावात नेहून गावातील नागरिकांना दूध मोफत वाटावे अशी आमची संघटनेची भूमिका आहे मात्र उद्यापासून तालुक्यातील एक थेंबही दूध मुंबईला जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

'मुस्लिम समाजाने केली रमजान मधील शेवयाची खीर' -
दरम्यान गावातील दूध संकलन बंद असल्याने  ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला गावातीलच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोफत दूध दिले. तर रमजान सणातील शिल्लक राहिलेला सुकामेवा वापरून त्याची शेवयाची खिर तयार करून त्यावर ताव मारल्याचे चित्र आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MilkAgitation Impact of milk agitation at mohol solapur