एसटीच्या मालवाहतुकीत दररोज होतोय लाखोंचा घोटाळा : नियमाचा गैरफायदा...प्रशासनाला दहा टनाची पावती; प्रत्यक्षात बारा टन वाहतूक 

st goods transport.jpg
st goods transport.jpg

सांगली-  कोरोना आपत्तीच्या काळात उत्पन्नवाढीसाठी "लालपरी' प्रवाशांबरोबर मालवाहतूक देखील करू लागली आहे. परंतू प्रवासी वाहतुकीप्रमाणे येथेही एसटीचे चाक तोट्यातच रूतलेले दिसून येते. एसटीमधून नियमाप्रमाणे दहा टन मालवाहतूक केली जात असल्याचे कागदावर दाखवले जाते. परंतू प्रत्यक्षात अकरा ते बारा टन अवजड वाहतूक या गाड्यामधून होते. बाजारातील दरापेक्षा एकतर कमी भाड्यात एसटी धावत असताना तिच्यातून विनाभाडे दोन टनाची जादाच वाहतूक सुरू आहे. राज्यभर राजरोस हा घोटाळा होत असून प्रत्येक विभागात त्याकडे दुर्लक्षच केले जाते. त्यामुळे "एसटी' ला राज्यात दररोज लाखो रूपयांचा अप्रत्यक्ष फटका बसत आहे. 

"प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन धावणारी एसटी गेल्या काही वर्षात तोट्यातच धावत आहे. कोरोनाच्या आपत्तीमध्ये नुकसान भरपाईसाठी आणि उत्पन्न वाढीसाठी एसटीने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे प्रत्येक आगारात काही गाड्यांमध्ये अंतर्गत बदल करून गाड्या मालवाहतुकीसाठी सज्ज ठेवल्या. प्रति किलोमीटर 38 ते 40 रूपये याप्रमाणे भाडे ठरवले. आज प्रत्येक आगारातून माफक दरात "लालपरी' मालवाहतूकीसाठी धावू लागली आहे. परंतू प्रवासी वाहतुकीप्रमाणे येथे देखील तोट्यातच धावत आहे. 

वास्तविक एसटी बसेसची बांधणी ही प्रवासी क्षमता लक्षात घेऊन केलेली आहे. त्यामुळे ही क्षमता आणि गाड्यांची झीज लक्षात घेऊन एका गाडीतून केवळ दहा टन माल वाहतूक करण्यासाठीच परवानगी दिली आहे. परंतू या नियमाचा गैरफायदा राज्यभर उठवला जात आहे. यामध्ये मालपुरवठादार कंपन्या, काही मालवाहतूकदार कंपनी आणि इतरांचा समावेश आहे. एसटीला दहा टन मालवाहतुकीसाठी प्रति किलोमीटरप्रमाणे भाडे दिले जाते. परंतू दहा टनाऐवजी प्रत्यक्षात 12 टनापर्यंत माल भरला जातो. ज्याला माल पाठवला जातो, त्याला वजनाप्रमाणे बिल पाठवले जाते. चालक केवळ वाहतुकीची जबाबदारी पार पाडतात. तरीही काही चालकांनी जादा टनाच्या पावत्या पुरावा म्हणून जपून ठेवल्या आहेत. एसटी प्रशासनाला दहा टनाची पावती आणि माल घेणाऱ्याला वेगळी पावती असा राजरोस प्रकार सुरू आहे. प्रत्येक फेरीत जादा माल भरून एसटीच्या गाड्यांचे एकतर नुकसान केले जाते. तसेच दुसरीकडे नियमाचा गैरफायदा घेऊन अप्रत्यक्षपणे लूटही केली जाते. राज्यात शेकडोंच्या संख्येने बसेस मालवाहतूक करत आहेत. त्याठिकाणी हा घोटाळा राजरोसपणे सुरूच आहे. प्रशासन केवळ दहा टनाची पावती पाहून किलोमीटरप्रमाणे भाडे मिळते ना? एवढ्यावरच समाधान मानत आहे. 

""एसटीच्या मालवाहतुकीमध्ये कारवाईसह सगळे ओझे चालकावरच टाकले आहे. सध्या सर्वत्र दहा टन वाहतुकीस परवानगी असताना पुरवठादार बारा टनापर्यंत माल भरून एसटीची राजरोस फसवणूक करत आहेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी होऊन फसवणूक थांबवली पाहिजे. जादा अंतरासाठी चालकाला सहाय्यक देणे आवश्‍यक आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे चालकांना कारवाईसह इतर त्रासाला सामोरे जावे लागते.'' 
-अशोक खोत (विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना) 
.................... 

""मालपुरवठादार अशा प्रकारे एसटी प्रशासनाची फसवणूक करत असतील तर प्रकरण गंभीर आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी विभाग नियंत्रक यांच्यामार्फत सर्व आगारांना सक्त सूचना केल्या जातील.'' 
-संजय बांगडे (विभागीय भांडार अधिकारी) 
.................. 

""सध्या मालवाहतुकीचे जग अतिशय वेगवान बनले आहे. नविन तंत्रज्ञानाचा येथे वापर केला जातो. खासगी वाहतूकदार जीएसटी कायद्यासह इतर कायदेशीर गोष्टींचे तत्काळ अनुपालन करतात. परंतू एसटी ही संस्थात्मक असल्यामुळे निर्णयात निर्बंध येतात. बाजारातील तेजीमंदीचा फायदा एसटीला मिळू शकत नाही. जुन्या गाड्यातून त्यांची वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड वाहतूक केल्यास व जीएसटी कायद्याचे पालन न केल्यास चालकांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भविष्यात त्यांना तोटा ठरलेला आहे.'' 
-महेश पाटील (संचालक, सांगली जिल्हा वाहतूकदार संघटना) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com