esakal | मार्केट यार्डात कोट्यवधीची उलाढाल ठप्प 
sakal

बोलून बातमी शोधा

market yard.JPG

सांगली-येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गर्दी होऊ न देण्याबाबत विश्रामबाग पोलिसांनी सूचना केली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने 31 मार्चपर्यंत कोणतेही सौदे न करण्याचा निर्णय घेतला आहे. हळद, गुळ व बेदाणा सौदे ठप्प झाल्यामुळे रोजची कोट्यवधी रूपयाची उलाढाल बंद झाली आहे. त्यामुळे आज मार्केट यार्ड परिसरात शुकशुकाट जाणवत होता. 

मार्केट यार्डात कोट्यवधीची उलाढाल ठप्प 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गर्दी होऊ न देण्याबाबत विश्रामबाग पोलिसांनी सूचना केली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने 31 मार्चपर्यंत कोणतेही सौदे न करण्याचा निर्णय घेतला आहे. हळद, गुळ व बेदाणा सौदे ठप्प झाल्यामुळे रोजची कोट्यवधी रूपयाची उलाढाल बंद झाली आहे. त्यामुळे आज मार्केट यार्ड परिसरात शुकशुकाट जाणवत होता. 


कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने देखील या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत गर्दी होऊ नये याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. हा आदेश धुडकावून बाजार समिती आवारात व्यापारी व अडते यांच्या एका गटाने बुधवारी (ता.18) बेदाणा सौदे घेण्याचा घाट घातला होता. त्यासाठी काही परप्रांतिय व्यापारी देखील उपस्थित होते. तर कोरोना बाबत दक्षता हवी म्हणून व्यापाऱ्यांच्या एका गटाने सौदे घेण्यास मज्जाव केला. त्यावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. अखेर बाजार समिती व पोलिस अधिकारी यांची बैठक झाली. त्यामध्ये 31 मार्चपर्यंत सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात सौदे घेण्यास मज्जाव केल्यामुळे आज सर्वत्र नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून आली नाही. किराणा दुकाने आणि व्यापारी पेढ्यामध्ये दैनंदिन व्यवहार सुरू होते. सौदे नसल्यामुळे व्यापारी व अडते यांच्या दुकानासमोर माल पडून असल्याचे चित्र दिसले. काही गल्ल्यांमध्ये तर पूर्ण शुकशुकाट जाणवला. हमालांच्या अड्ड्यावर काहीजण विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसले. व्यापारी दुकानातील हमाल, कर्मचारी यांची हालचाल तेवढी जाणवली. 


31 मार्चपर्यंत शेतमालाचे सौदे बंद राहणार असल्यामुळे रोजची 20 कोटीहून अधिक उलाढाल ठप्प राहणार आहे. आर्थिक मंदीमुळे व्यापार पेठ यापूर्वीच अडचणीत असताना आता "कोरोना' मुळे पुन्हा सौदे बंद राहणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे. 
 

परप्रांतिय व्यापाऱ्यांचा मुक्काम- 
बेदाणा सौद्यासाठी परप्रांतिय व्यापारी काही दिवस मुक्काम ठोकून होते. परंतू आता 31 मार्चपर्यंत सौदे बंद राहणार असल्यामुळे त्यांना मुक्काम स्थगित करावा लागणार आहे.