esakal | पोलिसांचा ऍक्‍शन प्लॅन तयार: कारवाई होणारच! गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

बोलून बातमी शोधा

null

पोलिसांचा ऍक्‍शन प्लॅन तयार: कारवाई होणारच! गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या काळात ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हिरचा पुरवठा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. "रेमडेसिव्हिर' इंजेक्‍शनची कुणी साठेबाजी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

कोरोना संकट काळात निर्बंध लागू करताना पोलिसांनी अतिशय दक्षता बाळगली आहे. त्याची त्यांनी पाहणी केली. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""रेमडेसिव्हिर आणि ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी रेमडेसिव्हिरचा काळा बाजार सुरु आहे. काही लोक साठवणूक करत असल्याची माहिती पुढे येत आहे. या काळात इंजेक्‍शनची अत्यंत गरज असून त्याचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तो साठा जप्त करून गरजूंना तातडीने देण्यात येईल.

ते म्हणाले, ""राज्यात सध्या जमावबंदीसाठी 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. निर्बंध आणखी कडक करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाऊ शकतो, त्याबाबत चर्चा सुरु आहेत. यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ होईल, काही ठिकाणी नाकाबंदी होईल. होमगार्डची संख्या वाढवली जाईल. या काळात पोलिसांचा जनतेशी थेट संपर्क येतोय, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांना कार्यालयातच काम दिले जाईल. त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी वेळोवेळी केली जाईल. बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिस वेलफेअर फंडामधून अधिकाऱ्यांना छावणीच्या ठिकाणी फुड पॅकेट, पाणी, प्राथमिक आरोग्याच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.''पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, पोलिस उपाधीक्षक किशोर काळे, कृष्णात पिंगळे, अश्‍विनी शेंडगे, अंकुश इंगळे, अशोक वीरकर, रत्नाकर नवले, अजित टिके, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड उपस्थित होते.

Edited By- Archana Banage