मंत्री शशिकला जोल्ले यांना कोरोनाची बाधा      

संजय साळुंखे 
Monday, 31 August 2020

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्राथमिक संपर्कात आल्याने मंत्री जाेल्ले यांनी शनिवारी (ता. 29) स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते.

निपाणी : एकीकडे निपाणीसह चिक्काेडी तालुक्यात कोराेना रुग्णांची संख्या वाढत असताना आज सोमवारी (ता. 31) राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आणि विजापूर जिल्हा पालकमंत्री शशिकला जोल्ले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

मंत्री जाेल्ले यांच्यासह त्यांचे चिरंजीव ज्योतीप्रसाद जाेल्ले आणि बसवप्रसाद जाेल्ले यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. मंत्री जोल्ले यांनी खबरदारी म्हणून आपल्या  संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन होण्याचे आवाहन फेसबुकद्वारे केले आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्राथमिक संपर्कात आल्याने मंत्री जाेल्ले यांनी शनिवारी (ता. 29) स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. आज (ता. 31) स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. काेराेनाच्या लढ्यात पोलिस व आरोग्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी पुढे राहून काम करत असताना मंत्री जाेल्ले यांचाही विविध बैठका व अन्य माध्यमातून लढ्यात सहभाग आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार मंत्री जाेल्ले व त्यांचे दोन्ही चिरंजीव 14 दिवस विलगीकरणात असणार आहेत. भाजपकडूनही तशी माहिती फेसबुकवर देण्यात आली आहे.

निपाणीत दाेन दिवसात २५ पाॅझिटीव्ह 

निपाणी शहरात दिवसेंदिवस काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (ता. 30) शहरात दहा जणांना कोराेनाची बाधा झाली होती.  शिवाय दोघांचा मृत्यू झाला होता. तर आज (ता. ३१) शहरातील १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरवासीयांची चिंता कमी होताना दिसत नाही.
 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister shashikala jolle has corona positive