
महाराष्ट्रातील कोणीही बेळगावला अभिवादन कार्यक्रमासाठी येऊ नये यासाठी अगोदरच कोगणोळी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेल्या आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कोगणोळी टोल नाक्यावर अडविण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली 17 जानेवारी रोजी सीमाप्रश्नासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन केले जाते यासाठी मंत्री यड्रावकर बेळगावला निघाले होते.
मात्र महाराष्ट्रातील कोणीही बेळगावला अभिवादन कार्यक्रमासाठी येऊ नये यासाठी अगोदरच कोगणोळी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यड्रावकर टोल नाक्यावर पोहचताच त्यांची अडवणूक करण्यात आली. यावेळी त्यांनी अशा प्रकारे अडवणूक करता येत नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी दादागिरी करत कोणत्याही परिस्थितीत जाऊ दिले जाणार असे सांगत त्यांची अडवणूक केली. याच्या निषेधार्थ टोलनाक्यावर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कर्नाटक पोलिसांचा धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. तसेच कर्नाटक सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध केला. यावेळी मंगेश चिवटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे
.