जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरूणाला चिरडले; जमावाकडून तोडफोड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीचा सोलापूरमध्ये अपघात झाला आहे. एका तरुणाचा  या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापूर : जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीला सोलापूर जिल्ह्यात अपघात झाला असून, त्यांच्या गाडीने एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने त्यांची गाडी फोडली आहे. 

या घटनेमुळे संपूर्ण सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांआधी हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता.

जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे. भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी पोहचले आहे.

श्याम होळे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुण हा बार्शीतील शेलगाव होळे गावातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे कोणाला अपघाताबद्दल समजू नये यासाठी तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून गाडीची नंबर प्लेट काढून ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलिस आता प्रकरणाचा तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Minister of Water Conservation crushed the young man