मद्यपान करताना बाचाबाची मिरजेत मावसभावाने केला तरुणाचा खून

प्रमोद जेरे
Tuesday, 12 January 2021

मिरज शहरातील मिशन हॉस्पिटल ते बस स्थानक रस्त्यावर हॉटेल सन अँड शाइन या परमिट रूमसमोर 32 वर्षांच्या तरुणाचा ब्लेडचे वार करून खून करण्यात आला.

मिरज (जि. सांगली) : शहरातील मिशन हॉस्पिटल ते बस स्थानक रस्त्यावर हॉटेल सन अँड शाइन या परमिट रूमसमोर 32 वर्षांच्या तरुणाचा ब्लेडचे वार करून खून करण्यात आला. मुन्ना मांगलेकर (वय 32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याच्या सख्ख्या मावसभावाने हा खून केला आहे. मन्सूर गौस शेख (वय 31) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव समोर आले असून तो पसार झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या खुनामध्ये मृत्यू झालेला मुन्ना मांगलेकर हा शहरातील रेवणी गल्ली परिसरात राहण्यास आहे. त्याचा मावसभाऊ मन्सूर गौस शेख हा संशयितही याच परिसरात राहतो.

हे दोघेही सायंकाळी मद्यपान करण्यासाठी सन अँड शाइन या परमिट रूममध्ये गेले. तेथे त्यांची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. यावेळी संशयित हल्लेखोर मन्सूर शेख याने मुन्ना मांगलेकर याच्यावर ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने अनेक वार केले आणि स्वतःच त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले;

परंतु तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि रुग्णालयातच हल्लेखोर संशयित मन्सूर शेख याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे रेवणी गल्ली परिसरातही तणाव निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत या परिसरातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खुनानंतर या परिसरातील या दोघांशीही संबंधित असलेले अनेक तरुण भीतीने गायब झाले आहेत.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj cousin brother killed a young man when while he was drinking