मिरज : बालगंधर्व बेकायदेशीरपणेच चालविण्याचा अट्टहास

आताही नाट्यगृहात अनेक कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत
मिरज बालगंधर्व नाट्यगृह
मिरज बालगंधर्व नाट्यगृहsakal

रंगकर्मींचेही सोयिस्कर मौन

उद्‍घाटनानंतर काही महिन्यांतच मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाची घरघर सुरू झाली. ही दैन्यावस्था काही थांबायचे नाव घेईना. सातत्याने दुरुस्तीच्या नावाखाली झालेला कोट्यवधीचा खर्च, तरीही बेकायदेशीरपणे नाट्यगृह चालवण्याचा महापालिकेचा अट्टहास... या दुष्टचक्रातून नाट्यगृहाची सुटका व्हावी व ते व्यवस्थित चालावे, यासाठी नेमके काय करावे लागेल, याचा वेध घेणारी ही मालिका...

मिरज: बालगंधर्व नाट्यगृहाची उभारणी आणि त्यानंतर देखभालीच्या खर्चाचा आकडा किमान बारा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नाट्यगृह नूतनीकरणाच्या नावाखाली लोकांच्या पैशाची अक्षरशः लूट झालीच, शिवाय तेवढ्यावरच समाधान नसलेल्या महापालिकेतील कारभारी आणि प्रशासनाने अजूनही बालगंधर्व नाट्यगृह बेकायदेशीरपणेच चालविण्याचा जणूकाही निर्धारच केला आहे. नुकतीच झालेली नाट्यस्पर्धा महापालिका आणि शहरातील रंगकर्मीनी बेकायदेशीरपणेच रेटून पार पाडली. आताही नाट्यगृहात अनेक कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत, पण हे सगळे नाट्यगृहात मनोरंजनाचा आनंद घेणाऱ्या रसिकांच्या जीवाशी खेळ करत सुरू आहे. याची जाणीव महापालिकेतील प्रशासन आणि कारभाऱ्यांना नसणे हे अपेक्षितच आहे, पण संवेदनशील म्हणविणाऱ्या रंगकर्मीनींही याबाबत सोयिस्कर मौन धारण करणे, हे धक्कादायक आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेल्या या नाट्यगृहात अग्निशमन यंत्रणाच नाही आणि कार्बन उत्सर्जनासाठी एखादाही पंखा (एक्झॉस्ट फॅन) नाही. अशा अवस्थेत नाट्यगृह चालू देणेच बेकायदेशीरच नव्हे, तर रसिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक नाट्यगृहाच्या सुरक्षिततेबाबत काही नागरिकांनी महापालिकेस न्यायालयात खेचून सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडले. त्यानंतरही याच प्रतिज्ञापत्राचे पालन केले नसल्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन तहसीलदार किशोर घा़टगे यांनी काही काळ नाट्यगृहाचा परवाना नाकारुन नाट्यगृह बंद ठेवले. यावेळीही महापालिका प्रशासनाने न्यायालयास दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे तालुका दंडाधिकाऱ्यांना काही महिन्यांत दुकान गाळे हटवून अग्निशमन गाड्यांचा मार्ग मोकळा करून देऊ, असे पत्र देऊन नाट्यगृह सुरू करण्यासाठी वेळ मारून नेली; पण अद्यापही न्यायालय आणि तालुका दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रांचा सोयिस्कर विसर महापालिकेस पडला आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि कारवाई होऊनही नागरिकांचे जीवित धोक्यात घालून महापालिकेतील प्रशासन आणि कारभाऱ्यांना हे नाट्यगृह बेकायदेशीरपणेच चालवायचे आहे, असेच सध्याचे चित्र आहे.

लोकेच्छेची गरज

किमान बारा कोटी रुपये खर्च करून बांधलेले बालगंधर्व नाट्यगृह आता केवळ चालविण्याचा नव्हे; तर त्याचे वातानुकूलित यंत्रणेसह चांगल्या पध्दतीने चालवण्याचा विचार शहरातील केवळ रंगकर्मीच नव्हे, तर सर्वांनी केला पाहिजे. एवढे चांगले नाट्यगृह टुकार पध्दतीनेच चालविण्याचा महापालिकेतील कारभाऱ्यांचा अट्टहास सर्वांनीच मोडून काढायला हवा. लोकप्रतिनिधींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले, तर या नाट्यगृहाचे रुपडे पालटणे अवघड नाही. गरज आहे ती सर्वांच्या इच्छेची...

सामान्य रसिक म्हणून संघर्ष सुरू राहील

बालगंधर्व नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या सुरक्षिततेकडे महापालिका प्रशासन आणि कारभारी दुर्लक्ष करत असले; तरी एक जबाबदार नागरिक म्हणून आमचा संघर्ष सुरूच राहील. नाट्यगृहाच्या सुरक्षिततेबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांना माहितीही नसणे ही आमच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक बाब आहे. सुरक्षिततेबाबत विविध स्तरावर सध्या पत्रव्यवहार सुरू आहे.

- जयदीप बागलकोटे, मिरज

एखाद्या दुर्घटनेची वाट पाहताय का?

नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य महापालिका प्रशासन आणि कारभाऱ्यांना एखाद्या गंभीर दुर्घटनेनंतरच लक्षात येणार आहे का? प्रेक्षकांच्या सुरक्षिततेपेक्षा महापालिकेतील प्रशासन आणि कारभाऱ्यांना अतिक्रमणेच महत्त्वाची वाटत आहेत, हेच महापालिकेचे प्रशासन आणि कारभाऱ्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झाले आहे. महापालिकेच्या कारभारी आणि प्रशासनाचे हे वर्तन योग्य नाही.

- धनंजय जोशी, रंगकर्मी, मिरज

सुरक्षितता महत्त्वाची समजून कार्यवाही करू

नाट्यगृहातील अतिक्रमणाबाबत आपणास काहीच माहिती नाही. तरीही प्रेक्षकांची सुरक्षितता महत्त्वाची समजून याबाबत माहिती घेऊन उचित कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

- दत्तात्रय लांगी, अतिरिक्त आयुक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका

बालगंधर्व नाट्यगृहातील प्रमुख त्रुटी

नाट्यगृहाच्या पूर्णत्वाचा दाखलाच नाही.

अग्निशमन विभागाचा परवाना नाही.

विद्युत यंत्रणा सुरक्षित नसल्याचा विद्युत निरीक्षकांचा आक्षेप.

वीजरोधक यंत्रणा नाही. एक्झॉस्ट फॅन नाही. बहुसंख्य पंखे बंद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com