मिरज - कोल्हापूर दरम्यान रेल्वेसेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मिरज - पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगेच्या पुराने धोक्याची पातळी गाठल्याने मिरज - कोल्हापूर दरम्यानची रेल्वेवाहतुक रोखली आहे. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ पाणीपातळी वाढल्याने सकाळपासून रेल्वेसेवा पुर्णतः ठप्प झाली. कोल्हापुरला जाणाऱ्या सर्व गाड्या मिरज स्थानकातून सोडण्यात आल्या.

मिरज - पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगेच्या पुराने धोक्याची पातळी गाठल्याने मिरज - कोल्हापूर दरम्यानची रेल्वेवाहतुक रोखली आहे. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ पाणीपातळी वाढल्याने सकाळपासून रेल्वेसेवा पुर्णतः ठप्प झाली. कोल्हापुरला जाणाऱ्या सर्व गाड्या मिरज स्थानकातून सोडण्यात आल्या.

सकाळी साडेआठ वाजता मिरजेतून सुटणारी सातारा - कोल्हापूर पॅसेंजर कोल्हापुरात पोहोचली, त्यानंतर मात्र सर्व गाड्या थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. बंगळूर - कोल्हापूर चन्नम्मा एक्सप्रेस, गोंदीया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापुरला जाऊ शकल्या नाहीत. हरिप्रिया एक्सप्रेस मिरजेतच थांबवून ठेवण्यात आली. दुपारी मिरजेतूनच सोडण्यात आली.

चन्नम्मा एक्सप्रेसदेखील मिरजेतून सोडण्यात आली. दुपारी 1.50 वाजता मिरजेतून निघणारी कोल्हापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली. संध्याकाळी ती मिरजेतून साताऱ्याला सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगतले. महाराष्ट्र एक्सप्रेस हातकणंगलेपर्यंत गेली, पण तेथून परत फिरली. 

मुंबईहून येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस कल्याणमधून मनमाड-दौंडमार्गे आली. पुरस्थितीमुळे तिचा मार्ग बदलला आहे, परिणामी नियोजित वेळेपेक्षा कितीतरी उशिराने ती धावली. कुर्डुवाडीमार्गे येत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. ती कोल्हापुरला न सोडता रात्री मिरजेतूनच सोडण्यात आली. कोल्हापूर-मिरज-पुणे-मुंबई यादरम्यान ठिकठिकाणी पुरस्थिती पाहून रेल्वे अधिकार्यांना गाड्या सोडण्याबाबत वेळोवेळी निर्णय घ्यावे लागत आहेत. या गोंधळाने मिरज रेल्वे स्थानकात शेकडो प्रवाशी अडकून पडल्याचे पहायला मिळाले. गाड्या ऐनवेळी रद्द झाल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांची धांदल उडाली. 

नव्या पुलावर 46 फूट पातळी
रुकडीजवळ पंचगंगेत उभारल्या जाणाऱ्या नव्या पुलाजवळ सकाळी 46 फूट इतकी पाणीपातळी होती. येथील रेल्वेचा पूल खुप जुना आहे. त्यामुळे धोका न पत्करता रेल्वे वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj - Kolhapur railway services closed