मिरजेच्या ऑनलाईन संगीत महोत्सवासही रंगत; शेकडो रसिकांचा प्रतिसाद

प्रमोद जेरे
Saturday, 24 October 2020

मिरज शहरातील प्रसिद्ध अंबबाई नवरात्र महोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या ऑनलाईन संगीत महोत्सवास शेकडो संगीतप्रेमींनी ऑनलाईन प्रतिसाद दिला आहे.

मिरज : शहरातील प्रसिद्ध अंबबाई नवरात्र महोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या ऑनलाईन संगीत महोत्सवास शेकडो संगीतप्रेमींनी ऑनलाईन प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत हा संगीत महोत्सव फेसबुकवर 635 जणांनी पाहिला आहे. तर नियमितपणे किमान पस्तीस ते चाळीस संगीतप्रेमी हा कार्यक्रम ऑनलाईन पहात आहे. 

यावर्षी प्रथमच हा प्रयोग संयोजकांनी केला असला तरी या पहिल्याच प्रयत्नास संगीतप्रेमींनी दिलेला प्रतिसादही मर्यादित असला तरी हा प्रयोग यशस्वी झाल्याचे लक्षण आहे. कोरोनामुळे मान्यवर कलाकारांच्या सादरीकरणास मर्यादा आल्याने संयोजकांनी स्थानिक कलाकारांना दिलेल्या संधीचेही कलाकारांनी सोने केले आणि हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. स्थानिक कलाकारांच्या अदाकारीसही शेकडो रसिकांनी ऑनलाईन पध्दतीने चांगली दाद दिल्याने या स्थानिक कलाकारांचाही आत्मविश्वास वाढला आहे. 

सदुसष्ट वर्षांची परंपरा असलेल्या या संगीत महोत्सावावरही यावर्षी कोरोनाचे सावट राहिले. संगीत महोत्सवास परवानगी नाकारली जाण्याची शक्‍यता गृहीत धरून संयोजकांनी ऑनलाईन संगीत महोत्सवाची संकल्पना पुढे आणली. प्रारंभी संयोजकांना प्रतिसादाबाबत शंका होती. पण ही शंका रसिकांनी खोटी ठरवत ऑनलाईन संगीतमहोत्सवासही उत्तम प्रतिसाद दिला. 

बहारदार अदाकारीमुळे वेगळा आयाम 
यावर्षीच्या ऑनलाईन संगीत महोत्सवाचा प्रारंभ हृषीकेश बोडस यांच्यासारख्या ख्यातनाम आणि प्रसिद्ध गायकाच्या हस्ते झाला. त्यानंतर भक्ती साळुंखे, मनमोहन कुंभारे, धनश्री गाडगीळ, भाग्यश्री कुलकर्णी, मोहसिन मिरजकर या कलाकारांनी बहारदार अदाकारीने या संगीत महोत्सवास एक वेगळा आयाम दिला. त्यामुळेच या ऑनलाईन कार्यक्रमासही रसिकांनीही उदंड प्रतिसाद देऊन संयोजकांना दाद दिली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj online music festival is also in full swing; Hundreds of fans responded