मिरज पंचायत समीती सभापतींचा राजीनाम्यास नकार

प्रमोद जेरे
Saturday, 12 December 2020

मिरज पंचायत समीतीच्या सभापती सुनिता पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

मिरज (जि. सांगली)  : मिरज पंचायत समीतीच्या सभापती सुनिता पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. भाजपा नेत्यांकडुन आपल्यावर अन्याय झाल्याची सभापती गटाची धारणा आहे. एकुणच राजीनाम्याचा विषय पंचायत समीतीसह स्थानिक नेत्यांच्या हातुन निसटल्याने हे राजीनामा प्रकरण खासदार संजय पाटील यांनीच हाताळावे अशी आता सदस्यांचीी धारणा आहे.याबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न मिरज पंचायत समीतीमध्ये यशस्वी करण्यासाठीही काही सदस्यांची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे.

पंचायत समीतीच्या इतिहासात प्रथमच भाजपास सत्ता मिळाल्याने सभापती आणि उपसभापतीपदासाठी सदस्यांचे समाधान करण्याचे पक्षाचे धोरण आहे.सभापतीपद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या पदावर सर्वच महिला सदस्यांना आणि उपसभापतीपदासाठी अन्य सदस्यांना संधी देण्याचे पंचायत समीतीमधील सदस्यांचे धोरण आहे.या धोरणास अनसरुन पंचायत समीतीमधील सदस्यांनी सभापती सुनिता पाटील यांचा निर्धारीत कालावधी संपल्याने त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली.पण सभापती पाटील यांचे पती आणि आरगचे नेते एस. आर.पाटील यांनी कोरोनामुळे काही काम करता आले नाही तसेच गेल्या काही महिन्यांपासुन पक्षीय पातळीवर आपल्याबाबत अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करुन राजीनाम्यास टाळाटाळ केली.मिरज पंचायत समीतीचे निर्णय खासदार संजय पाटील घेत असल्याने हा मामला सदस्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचविला.त्यांनीही सभापती सौ. सुनिता पाटील यांचे पती एस. आर. पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांना सभापतीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. आज दिवसभरात सभापती सौ. सुनिता पाटील यांनी राजीनामा दिला नाही. 

दरम्यान भाजपाच्या या सगळ्या हालचालींवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सदस्यांचे बारीक लक्ष आहे. फारशी वातावरणनिर्मीती न करता शांततेने महाविकास आघाडीचा जुमला जमविण्याची काही सदस्यांची इच्छा असली तरी संख्याबळाच्या मर्यादेमुळे काही सदस्य केवळ चाचपणी करण्यातच धन्यता मानत आहेत. 

सभापतीपदाची संधी मिळाली असली तरी अद्यापही समाधानकारक काम करता आलेले नाही. त्यातच तोंडावर ग्रामपंचायत निवडणुक आहे. त्यामुळे आमच्या गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच राजीनाम्याचा आम्ही निर्णय घेऊ. पद किंवा आधिकारांचे आम्ही भुकेले नाही. आमच्यासाठी काम महत्वाचे आहे. सध्या पुर्व भागात पाण्याची टंचाई भासु लागल्याने म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. 
- एस. आर. पाटील, आरग. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Panchayat Samiti chairperson refuses to resign