मिरज पंढरपूर दिंडी मार्गावर शुकशुकाट...वारकऱ्यांच्या सेवेक-यांंमध्ये अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मिरज (सांगली)- आषाढी वारीच्या आधी चार ते पाच दिवस माऊलीच्या गजराने न्हाऊन निघणा-या मिरज पंढरपूर रस्त्यावर यावर्षी शुकशुकाट आहे. हरिनामाचा गजर, तुकाराम ज्ञानेश्वराचे अभंग आणि रात्रीच्या कीर्तनाचे सूर कानावर पडत नसल्याने या दिंड्यांचे मिरजेतील सेवेकरी यावर्षी अस्वस्थ आहेत. 

मिरज (सांगली)- आषाढी वारीच्या आधी चार ते पाच दिवस माऊलीच्या गजराने न्हाऊन निघणा-या मिरज पंढरपूर रस्त्यावर यावर्षी शुकशुकाट आहे. हरिनामाचा गजर, तुकाराम ज्ञानेश्वराचे अभंग आणि रात्रीच्या कीर्तनाचे सूर कानावर पडत नसल्याने या दिंड्यांचे मिरजेतील सेवेकरी यावर्षी अस्वस्थ आहेत. 

उत्तर कर्नाटक आणि कोल्हापूरसह कोकणातील हजारो दिंड्यांमधील वारकऱ्यांकडून टाळमृदंगाच्या निनादात होणा-या माऊलीचा गजरात सारे मिरज शहर न्हाऊन निघते.पण केवळ कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षी हा निनाद ऐकावयास मिळाला नाही. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूरची यात्रा स्थगित केल्यामुळे गावागावातील दिंड्यांनी पंढरपूरकडे जाण्यासाठीचे प्रस्थानच ठेवले नाही. सहाजिकच मिरज पंढरपूर रस्ता यावर्षी माऊलीच्या गजराविना अक्षरश: सुनासुना राहिला.

वर्षातील आषाढ, कार्तिक, माघ आणि चैत्र या चार प्रमुख वा-यांसाठी शेकडो दिंड्या मिरज शहरातून पंढरपूरकडे रवाना होतात. उत्तर कर्नाटकातील बेळगाव विजापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांमधून या दिंड्या एकादशीच्या आधी कित्येक दिवस आपले प्रस्थान ठेवतात. या सर्व दिंड्यांचा मिरजमधील मुक्काम निश्चित असतो. त्यासाठी दिंडीचे वेळापत्रकही मिरज मुक्काम ग्रहीत तयार केले जाते. मिरज शहरातील सेवाभावी संस्था, मंडळे, वारकरी संप्रदाय आणि अनेक खाजगी व्यक्तीतसेच वैयक्तिक भक्तांकडून या हजारो वारकऱ्यांच्या निवासासह उत्तम भोजनाची व्यवस्था होत असते. हे सर्व अगदी मनोभावे एक पुण्यकर्म समजुन केले जाते. परंतु यावर्षी या सर्व पुण्यकर्मास आपण मुकल्याची खंत शहरातील या सर्व वारकरी सांप्रदायाच्या सेवेकऱ्यांना वाटते आहे.

गेल्या शेकडो वर्षांपासून सुरु असलेली दिंड्यांची परंपरा या वर्षी इतिहासात प्रथमच खंडित झाली आहे. त्यामुळे मिरज शहरातून जाणाऱ्या या दिंड्याविना मिरज शहरातील मुख्य रस्ते सुने सुने वाटते आहे. आषाढी वारीसाठी मिरज शहरातून प्रत्येक वर्षी किमान शंभर ते सव्वाशे दिंड्या पंढरपूरला जातात. या सर्व दिंड्यांमध्ये किमान 10 ते 12 हजार वारकरी असतात. या सर्व वारकऱ्यांकडून होणार ज्ञानेश्वर तुकाराम विठोबा माऊलीचे नामस्मरण, गायिले जाणारे अभंग आणि रात्रीच्या किर्तन ही याच सेवेक-यांसाठी एक पर्वणी असायची पण हे यावर्षी यापैकी काहीच नसल्याचे शल्य शहरातील या प्रत्येक सेवेक-यांना सलते आहे. 

सारे विश्वच सध्या आपत्तीग्रस्त असताना या आपत्तीमध्ये आपण भर घालणे हे कोणत्याही धर्मतत्वात बसत नाही. "साठविला हरी हृदय मंदिरी"" या तुकारामांच्या उक्ती प्रमाणे या विश्वातील चराचरात आमचा वारकरी सांप्रदाय माऊलीचे दर्शन घेतो. त्यामुळे यावर्षी घरातूनच मनःपूर्वक माऊलीला पंढरपूरच्या दिशेने नमस्कार करून आमची आषाढी वारी पावन होणार आहे.

-सुरेश नरुटे (अध्यक्ष, सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषद)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Pandharpur Dindi Marg Shukshukat