मिरज तहसिल कार्यालय 'ना घरी की...ना घाट की...'

शंकर भोसले 
Tuesday, 15 December 2020

मिरज  तालुक्‍याची प्रशासकीय जबाबादारी असलेल्या मिरज तहसिल कार्यालयाची अवस्था म्हणजे ना घरी की...ना घाट की...झाली आहे.

मिरज : तालुक्‍याची प्रशासकीय जबाबादारी असलेल्या मिरज तहसिल कार्यालयाची अवस्था म्हणजे ना घरी की...ना घाट की...झाली आहे. शुध्द पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंत असुविधाचा डोंगर तयार आहे. अनेक विभागात एजंटांनी धुमाकूळ घातला आहे. तहसिल कार्यालय परिसर खोक्‍यांनी व्यापले आहे. जप्त वाळू, मुरूमांच्या गाड्यांनी परिसर गुदमरत आहे. तहसिल परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग, पिचक-यांनी रंगलेल्या भिंती, व-हांड्यात निर्लेखण केलेले साहित्य, अस्वच्छ स्वच्छतागृह. त्यात पडलेल्या दारूच्या बाटल्या ही दुरवस्था म्हणजे किळसवाणे दृश्‍य आहे. 

नियमितपणे तहसिल कार्यालयातील संजय गांधी पेन्शन, पुरवठा शाखा, निवडणूक शाखा, रेकॉर्ड ऑफिस, कृषी कार्यालय, भुमापन कार्यालय, खरेदी विक्री कार्यालय येथे शहरी आणि ग्रामीण भागातून नियमित हजारो नागरिकांची वर्दळ असते. स्वच्छतागृहे सुस्थितीत असणे गरजेचे. मात्र ते नाहीच, उलट दारूंच्या बाटल्यांनी स्वच्छतागृहाच्या खिडक्‍यांही भरल्या आहेत. दुस-या माजल्यावर जाण्यासाठी असलेले जिणे पिचका-यांनी रंगले आहेत. स्वच्छ कार्यालय नियमाला तहसिल कार्यालयाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. 

तहसिल बाहेरील परिसर खोक्‍यांनी व्यापला आहे. आतील परिसरात दिसली जागा तर लाव गाडी अशीच नियमावली तयार झाल्याने ज्येष्ठांना अस्ताव्यस्त पार्किंगचा त्रास होत आहे. पुरवठासह संजय गांधी कार्यालय, कृषी कार्यालय, सेतू कार्यालय येथे एजटांनी बस्तान बसवले आहे. कोरोना संसर्ग काळात पाळावयाची नियमावली कोणीच पाळताना दिसत नाहीत. विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्स न ठेवता गर्दी असे प्रकार सुरू आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj tehsil office 'Na ghari ki ... na ghat ki ...'