मिरज : गुरुवार पेठ रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण

गुरुवार पेठ, चर्च रस्त्याच्या विकासाचे तांत्रिक, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण
गुरुवार पेठ आणि मंगळवार पेठ चर्च रस्त्याचे
गुरुवार पेठ आणि मंगळवार पेठ चर्च रस्त्याचे sakal

मिरज: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले शहरातील गुरुवार पेठ आणि मंगळवार पेठ चर्च रस्त्याचे प्रत्यक्ष रुंदीकरण लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे तांत्रिक आणि प्रशासकीय स्तरावरील सर्व सोपस्कार पूर्ण होत आले आहेत. शासकीय आणि महापालिका स्तरावरील तांत्रिक मान्यता आणि मालमत्ताधारकांची संमती या बाबी पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांत या दोन्ही रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. या दोन्ही रस्त्यांच्या विकासामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होणार असल्याची शहरातील नागरिकांना आशा आहे.

शहरातील मुख्य असलेल्या या दोन रस्त्यांच्या रुंदीकरणास शासनाने १९८२ च्या विकास आराखड्यात मान्यता दिली आहे. तेव्हापासून हे काम शहरातील कारभाऱ्यांच्या सततच्या विरोधामुळे आणि तत्कालीन नगरपालिका आणि सध्याच्या महापालिकेच्या निष्क्रिय प्रशासनामुळे रखडले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही रस्त्यांवरून जाणे म्हणजे वाहनधारकांसाठी एक दिव्यच ठरते. अरुंद रस्ते आणि वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे या रस्त्यांवरील वाहतूक दिवसातून किमान सहा-सात वेळा ठप्प होते. रस्ता छोटा आणि वाहतूक वाढल्याने या दोन्ही रस्त्यांवरील किरकोळ अपघातांमध्येही वाढ झाली आहे.

या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासनाने २०१५ पासून हालचाली सुरू केल्या. यासाठी पहिल्या टप्प्यात या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणात ज्यांची घरे ताब्यात घेतली जाणार आहेत, अशा सहाशेहून आधिक घरमालकांना नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर या दोन्ही रस्त्यांवरील मालमत्ताधारकांनी मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात केली असता, अनेक मालमत्तांची सीमांकने निश्‍चित नसल्याचे; तर शेकडो मालमत्तांच्या कागदोपत्री नोंदी, फाळणी नकाशे, मूळ नकाशे यासह अनेक कागदपत्रांमध्ये बरेच घोळ असल्याचे निदर्शनास आले.

अनेक मालमत्तांची कागदपत्रेच अस्तित्वात नसल्याने संबंधित वहिवाटदार आणि मूळ मालकामध्येही संभ्रम निर्माण झाला. अखेर महापालिका प्रशासनाने यासाठी स्वतंत्र आस्थापन तयार केले आणि त्याद्वारे कागदपत्रे, नकाशे याचा पाठपुरावा सुरू केला. नगररचना, भूमापन, भूमिअभिलेख या सर्वच विभागांकडे सातत्याने किमान तीन ते चार वर्षे बराच खटाटोप केल्यानंतर आता कुठे या मालमत्तांचे नकाशे, कागदपत्रे काही प्रमाणात तरी उपलब्ध झाली. आता या सर्व मालमत्ताधारकांशी महापालिका प्रशासनाने बैठकांद्वारे संवाद साधला आहे. या बैठकांमध्ये संबंधित मालमत्ताधारकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्याचेही मान्य केले आहे. त्यामुळे सध्या या सर्व मालमत्तांची सीमाकंने आणि हद्दी निश्‍चित झाल्यानंतर येत्या काही दिवसांत रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.

गेल्या आठ वर्षांपासून आपण स्वतः या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासनाकडे आग्रही आहोत. महापालिकेत यासाठी स्वतंत्र आस्थापन निर्माण करून त्याद्वारे शासनाच्या नगररचना, भूमिअभिलेख, भूमापन आणि महसूल या चार विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता कुठे या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण टप्प्यात दिसू लागले आहे.

- निरंजन आवटी, सभापती, स्थायी समिती, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका

रस्ता रुंदीकरणासाठी घर जागा ताब्यात घेताना महापालिकेकडून दिले जाणारे वाढीव चटईक्षेत्राचे आश्‍वासन फसवे वाटत आहे. याबाबत महापालिकेने लेखी हमीपत्र दिल्याशिवाय घर जागा रुंदीकरणासाठी जागा देणे उचित वाटत नाही.

- सदाशिव अमीनभावी, मालमत्ताधारक, गुरुवार पेठ,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com